सध्या काय करतोय 'नाळ'मधील हा चिमुरडा?, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:30 AM2019-11-16T06:30:00+5:302019-11-16T06:30:00+5:30
चैतूच्या भूमिकेतून बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
मागील वर्षी १६ नोव्हेंबरला 'नाळ' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने व त्यातील जाऊ दे नवं या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात चैतूच्या भूमिकेतून बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. आता श्रीनिवास कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार व सध्या तो काय करतोय, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
श्रीनिवास पोकळे मूळचा अमरावतीचा असून तो पाचव्या इयत्तेत शिकत आहे. श्रीनिवासने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नाळ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
त्याने सांगितले की, नाळ चित्रपटाच्या आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत. शूटिंगसाठी आम्हाला सहा वाजता उठायला लागायचे. नदीच्या पाण्यात शूटिंग होते. ऐन थंडीत पाण्यात उतरावे लागायचे. नाळमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांची मला आता खूप आठवण येते.
नाळ चित्रपटानंतर श्रीनिवासने राजकुमार आणि सुधाकर रेड्डी जॉर्ज रेड्डी नावाचा एक तेलुगु चित्रपट केला आहे. हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. यात त्याने मुख्य अभिनेत्याच्या बालपणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी त्याने तेलुगु भाषेचे धडेदेखील गिरविले.
नाळ चित्रपटानंतर श्रीनिवासला खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळे त्याचे पालक खूप खूश आहेत आणि त्यांना त्याचा खूप अभिमान वाटतो. त्याने अभिनय क्षेत्रातच करियर करावे, अशी त्यांची इच्छा आहे.