सुप्रिया पाठारेंना सिगरेट ओढायला वडिलांनी शिकवलं, सांगितला पहिल्यांदा धुम्रपान केल्याचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 09:58 AM2024-04-29T09:58:54+5:302024-04-29T10:00:05+5:30
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे (supriya pathare). आजवरच्या कारकिर्दीत सुप्रिया यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली. विविधांगी भूमिका साकारत त्या गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांची एक मुलाखत व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये वडिलांनी सिगारेट ओढायला शिकवल्याचा किस्सा सुप्रिया यांनी सांगितला आहे.
सुप्रिया पाठारे यांनी नुकतेच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. सुप्रिया यांच्या नाटकात काम करण्याच्या निर्णयाला वडिलांनी आणि आईने पाठिंबा दिला होता. आपले पहिले गुरू वडिलच होते, असेही सुप्रिया यांनी सांगितलं. नाटकासाठी सिगारेट ओढायलाही वडिलांनी शिकवल्याचा खुलासा त्यांनी केला. वडिलांबद्दल बोलताना सुप्रिया म्हणाल्या, 'लग्नाची बेडी या नाटकात मला सिगरेट ओढायची होती. पण, मला ती कशी ओढतात हे माहिती नव्हतं. मला माझ्या वडिलांनी ते शिकवलं'.
पुढे त्या म्हणाल्या, 'सिगरेट कशी ओढायची? स्टाइल कशी यायला पाहिजे? या गोष्टी मला माहीतच नव्हत्या. कारण मी कधी सिगरेट ओढले नव्हते. तेव्हा माझे वडील मला गावच्या देवळाच्या मागे घेऊन गेले आणि त्यांनी मला सिगरेट ओढायला शिकवलं. पण, ती गोष्ट माझ्या आईने पाहिली आणि म्हणाली, अहो त्या कार्टीला काय शिकवताय? तुम्ही तर तुम्ही आणि आता तिला शिकवताय? वडील मुलीला शिकवतायंत हे किती भयानक वाटत असेल ना, माझी आई तर गलितगात्र झालेली, पण माझ्या वडिलांना माहीत होतं की हे नाटकासाठी आहे. त्यानंतर मला कधी वाटलंही नाही की सिगरेट ओढावी. मला फक्त एक व्यसन आहे आणि ते म्हणजे- खाणं आणि पिणं'.
सुप्रिया पाठारे यांनी अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. 'होणार सून मी या घरची', 'ठिपक्यांची रांगोळी', 'जागो मोहन प्यारे', 'मोलकरीणबाई', 'पिंजरा' यासह अनेक मालिकांमध्ये त्या झळकल्या. सुप्रिया पाठारे सध्या स्टार प्रवाहवरील साधी माणसं या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेत त्या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी त्यांनी 'ठिपक्यांची रांगोळी', यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावरही त्या सक्रिय असतात. या माध्यमातून त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.