अडीच वर्षांच्या लेकाचा मृत्यू नानांनी डोळ्यांनी पाहिला, भावुक होत म्हणाले- "त्याचं नाव दुर्वास होतं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 04:35 PM2024-06-23T16:35:17+5:302024-06-23T16:35:46+5:30
गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या नानांनी मात्र लेकाचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्यांनी भाष्य केलं.
नाना पाटेकर हे मराठी सिनेसृष्टीकील लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीदेखील गाजवली. कॉमेडी, गंभीर , खलनायक अशा सगळ्याच भूमिकांमध्ये ते प्रेक्षकांना भावले. सिनेसृष्टीतील करिअरबरोबरच नाना त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत होते. गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या नानांनी मात्र लेकाचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला आहे.
नाना पाटेकरांनी नुकतीच 'लल्लनटॉप' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अभिनयातील करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य केलं. यावेळी नानांनी अडीच वर्षाच्या लेकाच्या मृत्यूबाबतही सांगितलं. मुलाची लाज वाटायची, असा खुलासाही त्यांनी या मुलाखतीत केला. त्याची खंत वाटत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. ते म्हणाले, "माझ्या मोठ्या मुलाला जन्मत:च डोळ्यांमध्ये समस्या होती. त्याला एका डोळ्याने दिसत नव्हतं. त्याला बघून मला वाटायचं की लोक काय म्हणतील नानाचा मुलगा कसा आहे...म्हणजे मला काय वाटतं ते बाजूला राहिलं. त्याचं नाव दुर्वास होतं. दुर्वास मुनींच्या नावावरुन त्याचं नाव ठेवलं होतं. अडीच वर्षांचा असताना त्याचा मृत्यू झाला. पण, त्या अडीच वर्षांत त्याने खूप काही शिकवलं. पण, आपण काय करू शकतो".
आयुष्यात नानांनी अनेक कठीण प्रसंगांचा मोठ्या हिमतीने सामना केला. त्यांच्या १४ वर्षांच्या मोठ्या भावाचाही मृत्यू झाला होता. "अशोकपेक्षा मला अजून एक मोठा भाऊ होता. त्याचं नाव वसंत होतं. माझ्या मावशीकडे मुंबईत तो राहायचा. एक दिवस अचानक माझ्या मावशीचे पती आमच्या घरी आले. तेव्हा कळलं की माझा मोठा भाऊ ज्याला काकांनी दत्तक घेतलं होतं. त्याचा पतंग पकडताना दोन बिल्डिंगच्यामध्ये पडून मृत्यू झाला. तो १४-१५ वर्षांचा होता. माझ्या आईने हे कसं सहन केलं माहीत नाही", ते म्हणाले.