Ashok Saraf : लोकांनी मला मारलं असतं, नाना पाटेकरने वाचवला जीव... अशोक मामांना आजही आठवतो तो प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:48 PM2023-04-25T19:48:04+5:302023-04-25T19:50:31+5:30
अशोक सराफ म्हणाले, त्या दिवशी नाना नसता तर काय झाले असते याचा विचार देखील मला करवत नाही.
मैत्रीचं नातं सगळ्या नात्यापेक्षा सुंदर म्हटलं जातं. आपल्या मित्रासाठी जीवाची बाजी लावणारे मित्र मिळायला देखील भाग्य लागत. असं भाग्य नाना पाटेकरांना (Nana Patekar) लाभलं आणि ऐन अडचणीच्या वेळी अशोक सराफ त्यांच्यासाठी वेळोवेळी धावून आले. विनोदाचा बादशहा असणारे अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीवरही राज्य करणारे अभिनेते नाना पाटेकर एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. काही वर्षांपूर्वी नानांसोबतच्या मैत्रीविषयी बोलताना अशोक सराफांनी एक किस्साही सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की कशाप्रकारे नाना पाटेकरांमुळे त्यांचा जीव वाचलेला.
यावेळी बोलताना अशोक सराफ म्हणाले की, 'नानाबरोबरचा माझा सहवास फक्त ८ महिन्यांचा होता, त्यावेळी आम्ही एकत्र काम केलं होतं. तसं म्हटलं तर नाना आणि मी एकत्र सिनेमात काम केलं होतं, पण त्याला सहवास म्हणता येणार नाही. मात्र आठ महिने आम्ही एकत्र हमीदाबाईची कोठी हे नाटक केलं. त्या हमीदाबाईची कोठी नाटकादरम्यान त्याची आणि माझी इतकी चांगली दोस्ती झाली, ती आजही कायम आहे.'
अशोक मामांनी या मुलाखतीमध्ये एक किस्साही सांगिताला. ते म्हणाले की, 'तुम्ही अडचणीत आहात असे समजल्यावर नाना केव्हाही धावून येईल. अगदी अंगावरचे कपडेही तो काढून देईल. त्या माणसाने माझा जीवही वाचवला आहे, नाहीतर लोकांनी मला मारलं असतं.' अशोक सराफ म्हणाले होते की, एका नाटकाचा प्रयोग रद्द झाल्याने लोक अक्षरशः मला मारण्यासाठी धावले होते. त्यावेळी "थिएटरच्या मागच्या बाजूने गटारातून उडी मारून आम्ही पळालो होतो. मला पकडून नाना धावला होता. तो दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी नाना नसता तर काय झाले असते याचा विचार देखील मला करवत नाही.
नाना आणि मामा म्हणजेच नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्यातील मैत्री ही शब्दात सामावणारी नाही. कारण रंगभूमीवर पाऊल ठेवल्यापासून एकमेकांच्या पडत्या काळात सोबतपर्यंत ते अगदी सुपरस्टार होईपर्यंत ते कायमच एकमेकांच्या सोबत राहिले आहेत. त्यांनी एकमेकांसोबत चित्रपटात जरी कमी काम केलं असलं तरी 'हमिदाबाईची कोठी' या नाटकामुळे त्यांच्यातील मैत्री घट्ट झाली. अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांनी एकमेकांना दिलेली साथ ते अजूनही विसरलेले नाहीत. त्यांच्यातील मैत्री आजही अशीच घट्ट आहे.