"महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...", नाना पाटेकरांचा भाजपा मंत्र्याला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 14:47 IST2023-09-09T14:46:28+5:302023-09-09T14:47:41+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत. याबाबत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर करत सल्ला दिला आहे.

"महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...", नाना पाटेकरांचा भाजपा मंत्र्याला सल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली होती. मुनगंटीवार स्वत: लंडनला महाराजांची नखे आणण्यासाठी जाणार आहेत. यावरुन आता सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी राज्यात सुरू असलेल्या भष्ट्राचारावरुन राज्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. “मुनगंटीवार महाराजांची वाघनखं आणताय, त्याबद्दल अभिनंदन...जमलं तर त्या वाघनखांनी भष्ट्राचाराचा कोथळा काढता आला तर पाहा...” असं म्हणत नाना पाटेकरांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा वध केला ती वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अलर्ब्ट वस्तूसंग्रालयात ठेवण्यात आली आहेत. इंग्रज राजवटीत ही वाघनखे इंग्लंडला नेण्यात आली होती. ब्रिटनच्या ताब्यात असलेली ही वाघनखे पुन्हा भारतात आणण्यात येणार आहेत. याबाबत एक करार केला जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात शिवप्रताप दिनी ही वाघनखे भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले होते.