मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? नाना पाटेकरांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले- "नटसम्राटने खूप पैसे दिले, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:21 IST2024-12-09T11:20:53+5:302024-12-09T11:21:15+5:30

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी दिलखुलास गप्पा मारल्या. बॉलिवूड गाजवलेले नाना मराठी सिनेमांमध्ये मात्र फारसे दिसत नाहीत. यामागचं कारण नानांनी या मुलाखतीत सांगितलं.

nana patekar revealed why he not did marathi movies after natsamrat | मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? नाना पाटेकरांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले- "नटसम्राटने खूप पैसे दिले, पण..."

मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? नाना पाटेकरांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले- "नटसम्राटने खूप पैसे दिले, पण..."

अभिनयाने मराठी आणि हिंदी कलाविश्व गाजवणारे नाना सगळ्यांचेच लाडके अभिनेते आहेत. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. नाना पाटेकर वनवास या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी 'लोकमत फिल्मी'शी खास संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी मराठी सिनेमा, राजकारण याबाबतही भाष्य केलं. 

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी दिलखुलास गप्पा मारल्या. बॉलिवूड गाजवलेले नाना मराठी सिनेमांमध्ये मात्र फारसे दिसत नाहीत. यामागचं कारण नानांनी या मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले, "खूप सुंदर काहीतरी आल्याशिवाय मला ते करावंसं वाटत नाही. मग ते हिंदी असो किंवा मराठी. हिंदीमध्ये अर्थातच पैसे खूप मिळतात. तसं नटसम्राटमध्ये मला खूप पैसे मिळाले. कारण, मी त्याच्यात भागीदार होतो. प्रोड्युसरने मला सांगितलं होतं की तुम्ही पार्टनरशिप घ्या. मराठी सिनेमांमध्ये तुम्हाला ४-५ कोटी नाही मिळणार. पण, नटसम्राटने मला ते पैसे दिले. पैसे हा महत्त्वाचा मुद्दा नाही. पण, तुम्ही छान काहीतरी करत राहिलं पाहिजे". 

मराठी सिनेमांबद्दल बोलताना नाना पाटेकरांनी प्राजक्ता माळीच्या फुलवंती सिनेमाचं देखील कौतुक केलं. ते म्हणाले, "मराठी भाषेला आपण पहिला दर्जा मिळवून देऊ शकतो. आपण मराठीत जाणीवपूर्वक बोललं पाहिजे. दर्जा मिळालाय ही फार मोठी गोष्ट आहे. पण, भाषेवरचं प्रेम रुजवता येत नाही ते असावं लागतं. प्रत्येकाने याकडे जाणीवपूर्व लक्ष दिलं पाहिजे. उगाच मी काहीतरी टुकार सिनेमा करणार आणि मराठी जागवायची म्हणून प्रेक्षकांनी तो सिनेमा पाहावा असं नाही. फुलवंती सिनेमा मी पाहिला नाही पण तो सिनेमा सुंदर असेल असं मला वाटतं. प्राजक्ता गोड काम करते. महाजनींचा मुलगा गश्मीरदेखील चांगलं काम करतो". 

Web Title: nana patekar revealed why he not did marathi movies after natsamrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.