नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 11:15 AM2024-11-29T11:15:26+5:302024-11-29T11:16:06+5:30
नानांना कशाची भीती वाटते असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना म्हणाले...
नाना पाटेकर (Nana Patekar) हे मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते. त्यांचं व्यक्तिमत्व अगदी भारदस्त आहे. अफाट ज्ञान, अभिनयाची ताकद त्यांच्याकडे आहे. नाना बोलत असले की समोरचे ऐकत राहतात. वयाच्या ७२ व्या वर्षीही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. लवकरच त्यांचा 'वनवास' सिनेमा रिलीज होत आहे. यानिमित्त ते प्रमोशन करत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी आपल्याला कशाची भीती वाटते याचा खुलासा केला.
'अमुक तमुक' ला दिलेल्या मुलाखतीत नानांना कशाची भीती वाटते असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना म्हणाले, "मला कशाचीच भीती वाटत नाही. मृत्यूचीही भीती वाटत नाही. मला भीती याची वाटते की मला जे वाटतं ते मी प्रामाणिकपणे करतोय की नाही. माझ्या नकळत मी भ्रष्ट होतोय का. माझ्या हातून काही अपराध होतोय का त्याची भीती वाटते. व्यक्तीची भीती वाटत नाही. खरं तर तुम्हीच तुम्हाला मोठं करायचं असतं आणि तुम्हीच छोटे करता. फक्त तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे."
ते पुढे म्हणाले, "म्हणून मी म्हटलं आपणच आपला आरसा झाल्यानंतरचं आयुष्य सोपं असतं. पण आमची अनेक मंडळी आहेत ज्यांनी आरसे फोडून टाकले. मग एक दिवस अचानक कुठेतरी कोणीतरी आरसा दाखवला की त्यात एक माकड दिसतं. अरे! माझं माकड कधी झालं? मी तर असा नव्हतो असा स्वत:लाच प्रश्न पडतो. झालं रे बाबा, मधल्या काळात तुझं जे कर्तृत्व होतं ते असंच होतं ज्यामुळे तुझं माकड झालं. ते आरसे आपल्यापाजवळ आहेत ते त्यांना दाखवा."