"सरकारने दिलेले मेडल नंतर गंजतात", नॅशनल अवॉर्ड विनर गिरीश कुलकर्णींनी सांगितलं धक्कादायक वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:06 IST2025-04-03T16:05:58+5:302025-04-03T16:06:17+5:30
"नॅशनल अवॉर्डला फार पैसेही मिळत नाहीत", मराठी अभिनेत्याचं वक्तव्य

"सरकारने दिलेले मेडल नंतर गंजतात", नॅशनल अवॉर्ड विनर गिरीश कुलकर्णींनी सांगितलं धक्कादायक वास्तव
गिरीश कुलकर्णी हे मराठीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. उत्तम अभिनयाने दमदार भूमिका साकारत त्यांनी सिनेसृष्टीत स्वत:ची छाप पाडली. 'देऊळ' या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना २०११ साली सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथालेखनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं.
गिरीश कुलकर्णी यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना "राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता म्हणून आयुष्यात काय फरक पडला?" असं विचारण्यात आलं. त्यावर गिरीश कुलकर्णी म्हणाले, "काही नाही...असं काय असतं त्यात? एक त्या कामाबद्दलचं बक्षीस मिळालं...तर ते झालं. त्याला सरकारही फार पैसे देत नाही. म्हणजे ते जे मेडल देतात तेदेखील नंतर गंजतात. शासनच त्याला किंमत देत नाहीये...तर तुम्ही कुठे त्याला जास्त किंमत देता. त्याने काय होतं...नुसतं निवेदक बाईला दोन ओळी जास्त बोलाव्या लागतात. तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर आहात म्हणून तुमच्यासाठी कोणीही भूमिका लिहित नसतं. तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर आहात म्हणून तुमच्यासाठी कोणीतरी एका प्रोजेक्टची कल्पना केली आणि तुम्हाला त्यात घेतलं जावं...असं काहीही होत नाही".
दरम्यान, गिरीश कुलकर्णी यांनी 'भिरकीट', 'बॉईज २', 'हायवे', 'फास्टर फेणे', 'पोस्टकार्ड', 'एकदा येऊन तर बघा' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'विहीर', 'देऊळ', 'वळू', 'जाऊ द्या ना बाळासाहेब' हे त्यांचे गाजलेले सिनेमे. मराठीसोबतच 'देवा', 'गणपथ', 'दंगल' अशा काही हिंदी सिनेमांमध्येही ते झळकले आहेत. त्यासोबतच त्यांनी काही वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.