राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 06:30 AM2020-01-17T06:30:00+5:302020-01-17T06:30:00+5:30

६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘म्होरक्या’ चित्रपटाला मिळाला होता.

The National Award Winner Movie Mhorkya will be released soon | राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext


६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘म्होरक्या’ हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि ‘ऐसपैस’ ची प्रस्तुती असलेला म्होरक्या भारताबरोबरच इतर काही देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अमर देवकर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासह या चित्रपटातील कलाकार रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे यांना अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अजून एक उल्लेखनीय बाब अशी की या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते या सर्वांचा हा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही म्होरक्याने आपला ठसा उमटवला आहे.

'म्होरक्या' ही फक्त परेड शिकणाऱ्या एका लहान मुलाची गोष्ट नाही तर खरे म्हणजे ही जगाची, इतिहासाची, आपल्या भोवतालातल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक शेखर कपूर यांनी चित्रपट पाहिल्यानंतर दिली होती. समाजमाध्यमांवर चित्रपटाची प्रसिद्धी सुरु झाली असून, चित्रपटाचे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटासाठी तयार करण्यात आलेले आनंद शिंदेच्या आवाजातील 'म्होरक्या' गाणे चांगलेच गाजत आहे. यात पहिल्यांदाच आनंद शिंदेनी मराठीत रॅप गायले आहे. हा या चित्रपटाचा युएसपी म्हणता येईल.

या चित्रपटात रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे या बालकलाकारांसमवेत रामचंद्र धुमाळ, अनिल कांबळे, सुरेखा गव्हाणे आणि स्वतः लेखक दिग्दर्शक अमर देवकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील बहुतांशी कलाकारांना चित्रपटक्षेत्राचा अनुभव नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बार्शीसारख्या छोट्या शहरातील आजूबाजूच्या गावांमध्ये चित्रपट चित्रित झालेला आहे.

गणतंत्र दिनाला शाळेत होणाऱ्या परेडचे नेतृत्व करण्यास मिळावे यासाठी संघर्ष करणाऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलाची कथा म्होरक्यामध्ये सांगितली आहे. या कथेतून लोकशाहीतील नेतृत्वाबद्दल भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

Web Title: The National Award Winner Movie Mhorkya will be released soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.