८० लाखांचं बजेट अन् 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाची कमाई किती? सचिन पिळगावकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:00 PM2024-09-16T13:00:43+5:302024-09-16T13:02:08+5:30
२००४ साली आलेल्या 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याचा उलगडा सचिन पिळगावकरांनी केलाय (navra maza navsacha)
सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा हा मराठीतला एक क्लासिक सिनेमा. हा सिनेमा आजही टीव्हीवर लागला की हमखास बघणं होतंच. या सिनेमातले डायलॉग आणि कॉमेडी सीन्स प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ आहेत. 'नवरा माझा नवसाचा' सिनेमात लोकप्रिय कलाकारांची फौज होती. २००४ साली कोणताही सोशल मीडिया आणि प्रमोशनची इतर माध्यमं नसताना या सिनेमाने किती कमाई केली? याचा उलगडा सचिन पिळगावकरांनी एका मुलाखतीत केलाय.
'नवरा माझा नवसाचा'ची कमाई किती झाली?
Focusedindian या युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी याविषयी खुलासा केला. सचिन पिळगावकर म्हणाले, "नवरा माझा नवसाचा त्यावेळी अंदाजे ८० लाखांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. त्यावेळी सोशल मीडिया किंवा इतर प्रमोशनची साधनं नव्हती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५ कोटींची कमाई केली होती." असा खुलासा सचिन पिळगावकरांनी केला. सिनेमाच्या बजेटच्या तुलनेत 'नवरा माझा नवसाचा'ची कमाई बघता, सिनेमाने सुपरहिट कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर चांगले पैसे कमावले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
'नवरा माझा नवसाचा' सिनेमाविषयी
सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा २००४ साली रिलीज झाला. या सिनेमाचं दिग्दर्शन सचिन पिळगावकरांनी केलं होतं. सिनेमात सचिन-सुप्रिया, अशोक सराफ, सुनील तावडे, प्रदीप पटवर्धन, मधुराणी प्रभुलकर, विजय पाटकर हे कलाकार प्रमुख भुमिकेत होते. याशिवाय जॉनी लिव्हर, सोनू निगम, रिमा लागू, कुलदीप पवार या कलाकारांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. याच सिनेमाच सीक्वल अर्थात 'नवरा माझा नवसाचा २' २० सप्टेंबरला रिलीज होणार आहे.