'आम्ही काय कमी आहोत?' हॉलिवूडशी तुलना करत नीना कुळकर्णींनी दाखवला भारतीय इंडस्ट्रीला आरसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 05:45 PM2024-05-25T17:45:54+5:302024-05-25T17:47:36+5:30
वयामुळे भूमिका मिळणं कमी होतं याची खंत
मराठी तसेच हिंदीतही आपल्या अभिनयाचा डंका गाजवणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni). मालिका असो किंवा सिनेमा त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. गेल्या अनेक वर्षापासून त्या इंडस्ट्रीत काम करत आहेत. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी वयामुळे भूमिका मिळणं कमी होतं याची खंत व्यक्त केली. हॉलिवूडचं उदाहरण देत त्यांनी भारतीय सिनेइंडस्ट्रीवर टीका केली.
"कॅचअप" या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नीना कुळकर्णी म्हणाल्या, "हॉलिवूडमध्ये जे होतंय जसे की वयाचा विचार न करता मध्यवर्ती भूमिका लिहिल्या जातात ते आपल्याकडे होताना दिसत नाही याची मला अत्यंत खंत आहे. काय ताकदीच्या भूमिका आहेत. मग आम्ही काही कमी नाही आहोत आणि करु शकतो. जेव्हा मला फोटोप्रेम सिनेमा आला भलेही तो कमी बजेटचा असेल पण तो सिनेमा त्यांनी केला. जास्त वयाच्या महिलांना घेऊन फिल्म करणं, मग ते जास्त वय म्हणजे मध्यमवयीन कलाकारांनाच घेतलं जातं. पण जे वय दाखवायचंय त्याच वयाची बाई घ्यायला पाहिजे. पण आपल्याकडे ती मानसिकताच नाहीए."
नीना कुळकर्णी यांनी 'उत्तरायण', 'फोटोप्रेम', 'गोदावरी', 'पाँडिचेरी', 'देवी' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय 'ये है मोहोब्बते' सारख्या लोकप्रिय हिंदी मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली. आता लवकरच त्या 'येड लागले प्रेमाचे' या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसणार आहेत.