अभिनयाला रामराम ठोकत निळू फुलेंच्या लेकीनं नव्या क्षेत्रात ठेवलं पाऊल, 'हा' व्यवसाय केला सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:53 IST2025-03-03T16:52:48+5:302025-03-03T16:53:00+5:30
कलाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती घेत निळू फुलेंच्या लेकीनं नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

अभिनयाला रामराम ठोकत निळू फुलेंच्या लेकीनं नव्या क्षेत्रात ठेवलं पाऊल, 'हा' व्यवसाय केला सुरू
Gargi Phule: कृष्णाजी निळकंठ फुले म्हणजेच लोकप्रिय मराठी अभिनेते निळू फुले. करारी आवाज व दमदार अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात निळू फुलेंनी अढळ स्थान निर्माण केलं. आज निळू फुले आपल्यात नाहीत, पण त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहे. त्याची लेक अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते यांनी वडिलांकडून अभिनयाचा वारसा घेत कलाक्षेत्रात नाव कमावलं. अभिनय क्षेत्राबरोबरच राजकारणातही त्यानी हात आजमावला. आता कलाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती घेत निळू फुलेंच्या लेकीनं नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
गार्गी यांना फिरण्याची प्रचंड आवड आहे. याच आवडीला जोपासत त्यांनी आता ट्रॅव्हलिंग अॅप लॉन्च केलं आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "अभिनयासोबतच फूड आणि ट्रॅव्हलिंग हे पॅशन होतं. काहीतरी वेगळं करावं असं सारखं वाटतं होतं. कलाक्षेत्रात असलेल्या लोकांनी उत्पन्नाचा दुसरा एक मार्ग ठेवावा. प्रवास आणि फूड आवडत असल्यानं मग त्याच्यासंदर्भात काहीतरी करण्याची इच्छा होती. काय होतं आपण स्वप्न खूप पाहतो. पण, ते पुर्ण करायला धाडस लागतं आणि आर्थिक पाठबळ लागतं. सुदैवानं मला तसा पार्टनर मिळाला आणि आम्ही दोघांनी मिळून हे सुरु केलं आहे".
"माझ्या बाबांनी मला प्रवासाची सवय लावली. आता हा नुसता प्रवास नाहिये. अनुभवांची शिदोरी आहे. या ट्रॅव्हलिंग अॅपचा उद्देशच हा आहे की प्रत्येकानं गोड अनुभन घेऊन जावं. कदाचित कडू अनुभवदेखील येईल. आमच्याकडूनही चुका होती. पण चुकभूल द्यावी, घ्यावी. तो प्रवास करावा. आयुष्यात राहिलेल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या प्रवासात आपणच आपल्याला सापडत जातो. आमच्या टूरमधून एकांत मिळावा आणि माणूस म्हणून घडण्यात आमच्याकडून थोडासा हातभार लागावा".
गार्गी या 'झी मराठी' वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेतून या घराघरात पोहोचल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर त्या 'राजा राणीची गं जोडी', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'शुभविवाह' 'इंद्रायणी', 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकांमध्ये झळकल्या आहेत. आता त्याच्या या नव्या इनिंगसाठी चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.