नितीन देसाई यांच्यावर होता कर्जाचा डोंगर; एनडी स्टुडिओ होता जप्तीच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:07 AM2023-08-03T10:07:01+5:302023-08-03T10:08:15+5:30
मानसिकदृष्ट्या खचून त्यांनी जीवन संपविल्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली...
अलिबाग : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई गेल्या काही वर्षांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्यावर सुमारे २५२ कोटींचे कर्ज होते, अशी माहिती हाती आली आहे. कर्जाची थकबाकी आणि त्यावरील व्याजामुळे त्यांच्या खालापुरातील भव्य एनडी स्टुडिओवर जप्तीची नामुष्की ओढवणार होती. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचून त्यांनी जीवन संपविल्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.
देसाई यांनी १८ वर्षांपूर्वी उभारलेला एनडी स्टुडिओ गेल्या काही वर्षांपासून तोट्यात चालत होता. कोरोनानंतर या ठिकाणी कोणत्याही चित्रपट, मालिका व डॉक्युमेंटरीचे फारसे शूटिंगही होत नव्हते. त्यामुळेही ते त्रासले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईतील एडेलवाइज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडून १८० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यानंतर त्यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रा. लि. या कंपनीवर २५२ कोटींचे कर्ज झाले होते. कंपनीच्या दिवाळखोरीसंदर्भातील एडेलवाइज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा करण्यात आलेली याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलएटी) गेल्याच आठवड्यात दाखल करून घेतली होती. ७ मे रोजी त्यांच्या स्टुडिओला आग लागली. त्याच दिवशी त्यांना कर्जवसुलीसाठी नोटीसही बजावलेली होती.
२५ जुलै २०२३ रोजी एडेलवाइज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने त्यांच्याकडून वसुली होण्यासाठी ‘कॉर्पोरेट इनसॉलव्हन्सी रिझोल्युशन’ कार्यान्वित केले होते. रायगड जिल्हा प्रशासनालाही त्याबाबत पत्र पाठवून जप्तीसाठी परवानगी मागण्यात आली होती. या प्रक्रियेनुसार स्टुडिओचा लिलाव करून कंपनीकडून रक्कम वसूल केली जाणार होती.
कर्जवसुलीसाठी प्रकिया सुरू?
- नितीन देसाई यांनी सुरुवातीला सीएफएम या वित्तीय संस्थेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याबाबत २०१६ व २०१८ मध्ये दोन स्वतंत्र करारनामे झाले होते.
- या रकमेसाठी देसाई यांनी चौक येथील विविध तीन मालमत्ता (२६ एकर, ५-८९ एकर आणि १०.७५ एकर) तारण ठेवल्या होत्या.
- २ वर्षांपूर्वी सीएफएमने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडेलवाइज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. त्यांनी थकीत कर्जवसुलीसाठी न्यायालयीन प्रकिया सुरू केली होती.