एक काळ गाजवूनही उतारवयात राहायला घर नाही, जेवायला अन्न नाही, कलाकारांबाबत प्राजक्ता माळीची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:36 PM2023-03-21T18:36:59+5:302023-03-21T18:37:35+5:30
Prajakta Mali : प्राजक्ता माळीने नुकतेच एका मुलाखतीत कलाकारांबाबत एक खंत व्यक्त केली.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अभिनेत्रीने मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तसेच नुकतेच प्राजक्ताने प्राजक्तराज या नावाने पारंपारिक दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. यानिमित्ताने तिने एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत प्राजक्ताने कलाकारांबाबत एक खंत व्यक्त केली.
प्राजक्ता माळीचा पारंपारिक दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्यामागे खास उद्देश होता. पारंपरिक दागिने आपल्या महाराष्ट्रातच खूप कमी मिळतात. जास्त स्पर्धा नसल्यामुळे मी हा व्यवसाय करण्याचे ठरवले. अर्थात प्रेक्षकांचे हे माझ्यावरील प्रेम असल्याने मला व्यवसायात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पण हा व्यवसाय सुरू करण्यामागे आणखी एक कारण असल्याचे अभिनेत्रीने म्हटले.
प्राजक्ता म्हणाली की, अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे आहे. कुठल्याही एका गोष्टीत तुम्ही स्वतःला अवलंबून ठेवता कामा नये. कारण एक काळ गाजवलेली अनेक कलाकार मंडळी यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करताना दिसली आहेत. उतारवयात त्यांना राहायला घर नाही, जेवायला अन्न नाही अशा गोष्टी समोर येतात. तेव्हा कुठेतरी आपण व्यवसाय क्षेत्रात स्वतःला गुंतवून ठेवायला हवं. सुदैवाने माझ्या घरच्यांकडून मला विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले होते.
मी जेव्हा जुळून येती रेशीमगाठी मालिकेत काम करत होते तेव्हा मधूगंधाने मला सांगितलं होतं. तुझ्याकडे स्वतःची गाडी आहे, घर आहे आणि बँकेत १० लाख रुपये आहेत तर तुला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तिने सांगितलेली ही गोष्ट माझ्या डोक्यात अगदी फिट करून घेतली होती. त्या दृष्टीने मी एकेक पाऊल पुढे टाकत राहिले, असे प्राजक्ता म्हणाली.