'नशीबवान' सिनेमातील एकही कलाकारांनी केला नाही मेकअप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 02:55 PM2019-01-05T14:55:10+5:302019-01-05T15:17:53+5:30
'नशीबवान' चित्रपटात भाऊ कदम यांच्या कुटुंबातही असाच स्वप्नवत बदल घडतो आणि त्यांचे आयुष्यच बदलते. मुळात हा सिनेमा एका सफाई कामगाराच्या बदलणाऱ्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा क्षण असा येतोच, ज्याने त्याचे संपूर्ण आयुष्यच पालटून जाते. प्रत्येकालाच आयुष्यात 'नशीबवान' व्हावेसे वाटत असते आणि ही संधी कोणत्या न कोणत्या रूपात आपल्यासमोर येतेच. फक्त ती संधी ओळखण्याची नजर हवी. लँडमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेल्या 'नशीबवान' चित्रपटात भाऊ कदम यांच्या कुटुंबातही असाच स्वप्नवत बदल घडतो आणि त्यांचे आयुष्यच बदलते. मुळात हा सिनेमा एका सफाई कामगाराच्या बदलणाऱ्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. यात भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट सर्वसामान्य कुटुंबावर आधारित असल्याने यात कोणत्याही प्रकारचा झगमगाट नसून हा सिनेमा पाहताना प्रेक्षक त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जावेत, हा दिग्दर्शक अमोल वसंत गोळे यांचा मुख्य हेतू आहे. मुळात या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला दैनंदिन जीवनात भेटणारी आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच जवळचा वाटेल. सफाई कामगारांचे कुटुंब असल्याने सिनेमात कोणत्याही प्रकारचा भडकपणा, भरजरी पेहराव, भव्य सेट्स यांचा दिखाऊपणा नसून वास्तवाचं दर्शन घडवण्यात आले आहे. या चित्रपटात भाऊ कदम यांच्यासोबतच 'राष्ट्रीय पुरस्कार' प्राप्त मिताली जगताप–वराडकर आणि 'नशीबवान' या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री नेहा जोशी यांनीही तितक्याच ताकदीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मिताली जगताप–वराडकर ही भाऊ कदम यांच्या पत्नीची भूमिका बजावत असून ती घरकाम करणारी बाई दाखवली आहे. एक घरकाम करणारी बाई कशी असते, तिचे वागणे, बोलणे, तिचे राहणीमान अशा बारीक सारीक गोष्टींवर संपूर्ण टीमने भरपूर मेहनत केली आहे. अगदी नेलपॉलिशपासून ते चपलांपर्यंतच्या बारीकसारीक गोष्टींकडेही बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. तर नेहा जोशी या चित्रपटात भाऊ कदम यांची सहकारी दाखवली आहे. तिची स्वप्ने, ती स्वप्ने सत्यात उतरतानाच, मनात होणारी धाकधूक, तिचे हावभाव, लाजराबुजरा स्वभाव, देहबोली अशा छोट्या छोट्या गोष्टींकडेही चोख लक्ष दिले आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात कोणत्याही कलाकाराला मेकअप केलेला नाही. निव्वळ आपल्या सहज, सुंदर अभिनयाने त्यांनी या व्यक्तिरेखांना एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.
चित्रपटाची गरज आणि हा चित्रपट प्रेक्षकांना वास्तवदर्शी वाटावा, यासाठी सिनेमाचे बरेसचे चित्रीकरण हे रहदारीच्या ठिकाणी तेही कोणाचेही काम खोळंबू नये, याची काळजी घेऊन केले आहे. कलाकारांची लोकप्रियता पाहता, छुपे कॅमेरे लावून हे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी निर्मित या चित्रपटाचे अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील निर्माते आहेत तर प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाने भरलेला हा कौटुंबिक सिनेमा भावनिक संदेश देणारा असून कुटुंबासमवेत नक्कीच पाहावा, असा आहे. ११ जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे