'नटाच्या कोणत्याही इमोशनला कुणीही..', नाना पाटेकरांसोबत विक्रम गोखलेंचा व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 04:51 PM2022-11-26T16:51:26+5:302022-11-26T16:55:09+5:30
Vikram Gokhale : विक्रम गोखलेंनी ७७व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सिनेइंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. विक्रम गोखले मागील २० दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर 'नटसम्राट'मधील एक सीन सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नटसम्राट' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटात नाना पाटेकर 'गणपतराव बेलवकर' या मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले तर अभिनेते विक्रम गोखले यांनी रामभाऊंची भूमिका साकारली होती. या चित्रपटात गणपत आण रामा यांच्यातील बरेच डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. त्यातील एक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या सीनमध्ये पाहायला मिळत आहे की, दोन मित्र गणपत आणि राम दोघेजण एकत्र मद्य प्राशन करत असतात. यावेळी दोघेही त्यांच्या रंगभूमीवरील दिवसांमध्ये रमतात, त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे याविषयीही चर्चा होते. यावेळी विक्रम गोखलेंच्या तोंडी एक संवाद आहे. ते म्हणतात की, 'नटाच्या कोणत्याही इमोशनला कुणीही कधीही सीरियसली घेत नाही'. त्यांचा अजून एक संवाद या सीनमध्ये आहे. या संवादात विक्रम गोखले म्हणतात की, 'अभिनेत्याने अभिनेता म्हणूनच मरावे. हे नटपण आहे ना हे असं पेशीत जाऊन घुसतं, साचतं. नट जातो विस्मरणामध्ये पण त्याने केलेल्या भूमिका चिरंतन राहतात.' हा सीन खरंतर नाना पाटेकर साकारत असलेल्या गणपतरावांना भास होत असतो. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर हा सीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.