नागराज मंजुळेसाठी नाही तर या अभिनेत्यामुळे 'झुंड' सिनेमाला दिला अमिताभ यांनी होकार !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 07:15 AM2020-01-16T07:15:00+5:302020-01-16T07:15:00+5:30
अमिताभ यांचे पुढील वेळापत्रक कोणत्याही गोष्टींमुळे कोलमडणार नाही याची निर्मांत्यांनी पुरेपुर काळजी घेत पुढच्या 45 दिवसांत सिनेमाचे शूटिंग संपवले.
नागराज मंजुळेचा आगामी 'झुंड' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सैराटप्रमाणेच या सिनेमालाही रसिकांची पसंती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सुरूवातीपासूनच ‘झुंड’ सिनेमा वादाच्या भोव-यात अडकला आहे. सुरूवातीला सिनेमाच्या मेकर्सवरच कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. अनेक वादाला बाजुला सारत हा सिनेमा अखेर पूर्ण झाला आहे. या सिनेमाविषयी सध्या खूप चर्चाही रंगत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी 'झुंड' हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. शूटिंग दरम्यानच अमिताभ यांनी सिनेमाकडे पाठ फिरवली होती. केवळ आमिर खानच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन पुन्हा या सिनेमात काम करण्यास तयार झाले. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिकेत झळकणार असल्याचे समजतंय.
या सिनेमाच्या शूटिंगवेळी अनेक अडचणी आल्या. सतत शूटिंगच्या तारखांमध्ये बदल होत होता यामुळे अमिताभ यांचे कामाचे शेड्युअलही बिघडत होते. त्यामुळे अमिताभ यांनी हा सिनेमा करणार नसल्याचे नागराज मंजुळेला कळवले होते. निर्मात्यांकडून घेतलेले मानधनही अमिताभ यांनी परत केले होते. अमिताभ यांना परत सिनेमात आणण्यासाठी आमिर खानला मध्यस्ती करावी लागली.
अमिताभ यांचे पुढील वेळापत्रक कोणत्याही गोष्टींमुळे कोलमडणार नाही याची निर्मांत्यांनी पुरेपुर काळजी घेत पुढच्या 45 दिवसांत सिनेमाचे शूटिंग संपवले. शूटिंगवेळी अमिताभ हे व्हॅनिटीत न बसता झोपडपट्टीतील मुलांसह वेळ घालवत असत. याच मुलांबरोबर त्यांनी सिनेमात शूटिंगही केले आहे. नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाची प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नसून याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.