बाबो..! 'सरसेनापती हंबीरराव'साठी कलाकारांपेक्षा तिने घेतले सर्वाधिक मानधन, जाणून घ्या कोण आहे 'ती'?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 01:54 PM2022-05-30T13:54:06+5:302022-05-30T13:56:22+5:30
Pravin Tarde: गेल्या काही दिवसांपासून प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनीत सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाची खूप चर्चा होते आहे. या चित्रपटासंदर्भातील बरेच किस्से ऐकायला मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनीत 'सरसेनापती हंबीरराव मोहिते' (Sarsenapati Hambirrao Mohite) चित्रपटाची खूप चर्चा होते आहे. या चित्रपटासंदर्भातील बरेच किस्से ऐकायला मिळत आहेत. त्यातीलच एक आश्चर्य वाटेल अशी बाब समोर आली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना यातील कलाकारांना नव्हे तर दुसऱ्याच कोणालातरी सर्वाधिक मानधन द्यावे लागल्याचे समोर आले आहे.
शिवाजी महाराजांच्या नेतृत्वातील सरसेनापती यांची शौर्यगाथा सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमात मांडण्यात आली आहे. यानिमित्ताने संवाद साधताना अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काही रंजक किस्से सांगितले. या गप्पांमध्ये अर्थातच उल्लेख आला तो या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचा. सरसेनापती चित्रपटातील प्रत्येक गोष्ट ही दर्जेदारच आहे असं सांगताना प्रवीण तरडे यांनी ऐतिहासिक चित्रपटाचे गणितच मांडले आहे. ऐतिहासिक सिनेमाचा विषय, मांडणी, कलाकार यापेक्षाही अशा चित्रपटाचे बजेट हाच खरा ऐतिहासिक चित्रपटाचा हिरो असतो आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटात बजेटवर हात आखडता न घेतल्यानेच त्याची भव्यता दिसते असे प्रवीण तरडे यांनी सांगितले.
सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. या चित्रपटातील कलाकारांपैकी एका खास कलाकाराचे मानधन सर्वात जास्त होते. या चित्रपटात प्रवीण तरडेंवर जे घोडेस्वारीचे सीन शूट झाले आहेत त्या सीनमधील घोडी सेलिब्रिटी आहे. या सिनेमात सर्वाधिक मानधन हे त्या घोडीनेच घेतले आहे. तान्हाजी-द अनसंग हिरो या चित्रपटात अभिनेता अजय देवगणनेही हीच घोडी वापरली होती.
हंबीरराव चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईतून एसी ट्रकमधून या घोडीला शूटिंगच्या ठिकाणी आणलं जायचं. तिचा रोजचा आहार, तिला लागणारी एसी व्यवस्था यावर निर्मात्यांनी अगदी हात सोडून खर्च केला. यालाही खास कारण आहे. या घोडीने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे तिला सेटवरचे काही विशिष्ट शब्द पाठ झाले आहेत. रोल साउंड म्हटलं की ती घोडी अंग झटकून ताठ होते. रोल कॅमेरा म्हटले की पायाने धूळ मागे सारते, अॅक्शन म्हटलं की ती धावायला लागते आणि कट म्हटले की थांबते. तिचा हा सेन्स अतिशय उत्तम आहे.