ओंकार दीक्षितचे 'ह्या' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 08:00 AM2019-01-28T08:00:00+5:302019-01-28T08:00:00+5:30
चित्रपटसृष्टी ही विलक्षण गोष्ट आहे. कारण इथे अनुभव महत्त्वाचा असतोच पण नव्याची ऊर्जाही तितकीच महत्त्वाची असते. अशीच नवी उर्जा घेऊन ओंकार दीक्षित हा नवा अभिनेता प्रेक्षकांसमोर येत आहे.
चित्रपटसृष्टी ही विलक्षण गोष्ट आहे. कारण इथे अनुभव महत्त्वाचा असतोच पण नव्याची ऊर्जाही तितकीच महत्त्वाची असते. अशीच नवी उर्जा घेऊन ओंकार दीक्षित हा नवा अभिनेता प्रेक्षकांसमोर येत आहे. परफ्युम या चित्रपटातून ओंकार चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे.
'हलाल'सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी 'लेथ जोशी' चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी 'परफ्युम'ची प्रस्तुती केली आहे. एच आर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसा बागल यांच्यासह चित्रपटात सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, भाग्यश्री न्हालवे, अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, कमलेश सावंत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. किशोर गिऱ्हे यांची कथा असून, पॉल शर्मा यांनी संकलन केलं आहे. हा चित्रपट १ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
चित्रपट, भूमिकेविषयी ओंकार म्हणाला, परफ्युम या चित्रपटात गरीब घरातून संघर्ष करणाऱया मुलाची भूमिका मी केली आहे. त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते आणि त्याचं आयुष्य कसे बदलते हे या चित्रपटात दाखवले आहे. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता. कारण चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ही भूमिका करण्याची संधी मिळाली. या भूमिकेसाठीचा प्रवास २०१६ पासून सुरू झाला. या भूमिकेसाठी मला खूपच मेहनत करावी लागली. कारण माझे वजन खूप कमी होते. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी जिमला जाणे सुरु केले. स्विमिंग, सायकलिंग शिकलो. माझ्या भाषेवर, अभिनयावर, हावभावांवर काम केलं. या भूमिकेचे कंगोरे उलगडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. या चित्रपटानं माझी जडणघडण केली, त्यामुळे हा चित्रपट माझ्या आयुष्यात कायमच महत्त्वाचा असेल.