"ओटीटी’मुळे मराठी चित्रपटांचे अधिक नुकसान"; प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:41 PM2024-08-12T13:41:31+5:302024-08-12T13:42:15+5:30
मराठी चित्रपट ओटीटीवर स्वीकारत नाहीत कारण प्रेक्षक पाहतच नाहीत, अशीही व्यक्त केली खंत
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मराठी चित्रपटाचे ओटीटीने जास्त नुकसान केले आहे. पूर्वीचे हक्काचे प्रेक्षक असलेल्या जागा आता बदलत आहेत. हल्ली दाक्षिणात्य चित्रपटांकडे प्रेक्षक वळू लागला आहे. ओटीटीवर दर आठवड्याला दोन तरी दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होतात. मराठी चित्रपट मात्र ओटीटीवर स्वीकारत नाहीत, कारण प्रेक्षक पाहतच नाहीत, अशी खंत प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे आणि ग्रंथाली यांच्यावतीने लेखिका सारिका कुलकर्णी लिखित ‘बे दुणे पाच’ या बालसाहित्यावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी पार पडला. दिग्दर्शक कुलकर्णी म्हणाले की, मराठी चित्रपट हा सिनेमागृह वा ओटीटीवर प्रेक्षकच पाहत नाहीत. मॉलमध्ये जाऊन पैसे खर्च करतील; पण २००-४०० रुपयांचे पुस्तक विकत घेत नाहीत. पूर्वी नागरिकांकडे कॅसेट, पुस्तके यांचा संग्रह होता. मराठी साहित्य संमेलनातच पुस्तक विक्री होते, असे म्हटले जाते. ते म्हणाले की, मी ज्या कलाक्षेत्रात वावरतो तेथे मी केले, असे म्हणायला वाव नसतो. दिग्दर्शक हा कधीही रिक्रिएटर असतो, मूळ क्रिएटर नसतो.
विनोदी स्त्री लेखिका हा शब्द मुळात चुकीचा आहे. विनोदी लेखन करणाऱ्या स्त्री लेखिका असे म्हणायला हवे. स्त्री साहित्यिकांकडे प्रेम, कविता लिहिणारी भाबडी व्यक्ती म्हणून पाहिले जाते. मात्र, गेल्या ३० ते ४० वर्षांच्या प्रवासात एकांकिकेपासून प्रायोगिक व्यासपीठावर स्त्री नाटककार उत्तम आल्या. स्त्रियांच्या लेखनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ग्रंथालीचे प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले. राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल विनायक गोखले यांचा ‘ग्रंथाली’तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक, गजेंद्र अहिरे हेही उपस्थित होते.