कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं गरजेचं-हर्षदा खानविलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 12:06 PM2017-12-26T12:06:20+5:302017-12-26T17:36:20+5:30

अबोली कुलकर्णी  अस्सल मराठमोळा बाणा, मराठी इंडस्ट्रीबद्दलची ओढ आणि संस्कारांसह नीतिमूल्यांची जपणूक या सर्व बाबी अनुभवायच्या असतील तर अभिनेत्री ...

Out of the Comfort Zone, Harshada Khanvilkar needs to | कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं गरजेचं-हर्षदा खानविलकर

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं गरजेचं-हर्षदा खानविलकर

googlenewsNext
ong>अबोली कुलकर्णी 

अस्सल मराठमोळा बाणा, मराठी इंडस्ट्रीबद्दलची ओढ आणि संस्कारांसह नीतिमूल्यांची जपणूक या सर्व बाबी अनुभवायच्या असतील तर अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचं नाव अग्रक्रमाने पुढे येते. ‘आभाळमाया’,‘कळत नकळत’,‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ यांसारख्या असंख्य मालिका, नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे हर्षदा खानविलकर हे नाव घेताच ‘पुढचं पाऊल’ मालिकेमधील आक्कासाहेब ही व्यक्तीरेखा डोळयांसमोर उभी राहते. एवढंच नव्हे तर तुमच्या आमच्या लाडक्या हर्षदा ताई खानविलकर आता कलर्स मराठीवरील ‘नवरा असावा तर असा’ या मालिकेमधून सुत्रसंचालकाच्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येत आहेत. ‘नवरा खेळणार अन् बायको जिंकणार’ असं काहीसं मालिकेचं स्वरूप असून प्रत्येक सोम ते शनि संध्या ६.३० वा फक्त कलर्स मराठीवर आगळ्यावेगळया गेमशोमध्ये गप्पा-टप्पांसोबतच गेम्सचा तास रंगत आहे. या कार्यक्रमाविषयी आणि एकंदरितच त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा...

* आत्तापर्यंत तुम्ही अभिनेत्री म्हणून विविध मालिका गाजवल्या आहेत. आणि आता सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांसमोर आला आहात, काय वाटते?
- होय, मी आत्तापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. सुत्रसंचालकाच्या भूमिकेत मी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर आले आहे. मात्र, हे एक आव्हान आहे. रोज नव्या कपलला मला भेटायला मिळते आहे. खूप नवे अनुभव येतात, नवीन गोष्टी शिकायलाही मिळतात. मजा येतेय.

* सुत्रसंचालकाची आॅफर मिळाल्यावर तुमची पहिली रिअ‍ॅक्शन कशी होती? काय तयारी करावी लागली?
- वाहिनीकडून मला या कार्यक्रमासाठी सुत्रसंचालकाची आॅफर मिळाल्यावर माझी पहिली रिअ‍ॅक्शन ‘नाही’ अशीच होती. मात्र, वाहिनीकडून मला खूप पाठिंबा मिळाला. आणि हे एक आव्हान होतं जे मला एक आर्टिस्ट म्हणून पेलणं अत्यंत महत्त्वाचं होतं. तयारी म्हटली तर फार काही विशेष नाही. फक्त दररोज नव्या जोडीसोबत पाटी कोरी ठेऊन भेटते. त्यामुळे अजून मजा येते. 

* ‘नवरा असावा तर असा’ या शोची कन्सेप्ट खूपच वेगळी आहे? काय सांगाल तुमच्या अनुभवाविषयी?
- ‘नवरा असावा तर असा’ हा एक मिश्किल कार्यक्रम असून भावनांचा गेमशो आहे. घरातील बाई नेहमी घरासाठी, आपल्या माणसांसाठी त्यांच्या सुखासाठी झटत असते, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असते. आपले दु:ख, आनंद, भावना बायका लगेचच व्यक्त करतात पण, पुरूषांना व्यक्त होण्याची, स्वत:हून काही खास करण्याची संधी तशी कमीच मिळते. पण, या कार्यक्रमाद्वारे पहिल्यांदाच घरातील पुरुषमंडळींना संपूर्ण महाराष्ट्रासमोर त्यांच्या बायकोला आवडणारी एखादी खास गोष्ट करण्याची संधी मिळणार आहे जे पाहून त्यांच्या गृहलक्ष्मी नक्कीच त्यांच्यावर खुश होणार आहेत. कार्यक्रमामध्ये बायको नवºयासाठी आव्हान ठरवणार आणि जिचा नवरा हे आव्हान पूर्ण करणार तोच त्या भागाचा विजेता ठरणार आहे. यामध्ये गंमत अशी आहे की, जिंकणार नवरा आणि बक्षीस मिळवणार बायको. इतकेच नसून विजेत्या बायकोला आकर्षक मंगळसूत्र देखील मिळणार आहे.

* शोच्या कॉस्च्युम्सविषयी काय सांगाल?
- साडी हा माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या कार्यक्रमात मी वेगवेगळया साड्यांमध्येच दिसत आहे. या माझ्या कॉस्च्युमचे विशेष म्हणजे या साडीच्या रंगाची फुले मी केसात माळणार आहे. हे माझे कॉस्च्युम प्रेक्षकांना आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि हीच स्टाईल स्टेटमेंट म्हणून महिला फॉलो करतील, अशी इच्छा आहे.

* मालिकेशिवायचा एक वेगळा प्रश्न, तुम्हाला अ‍ॅक्टिंग आणि प्रोडक्शन याशिवाय कॉस्च्युम डिझाईन करणं आवडतं. याविषयी काय सांगाल?
- खरं सांगायचं तर, मी या इंडस्ट्रीचा एक भाग आहे. एक अभिनेत्री म्हणूनच माझा उल्लेख होणं मला अधिक प्रिय असेल. कलाकार म्हणून मला या इंडस्ट्रीने बरंच काही दिले आहे. घडवलं आहे, शिकवलं आहे. या प्रवासात जगण्याचे वेगवेगळे आयाम स्वीकारत असताना एक आर्टिस्ट असणं आम्ही विसरू शकत नाही.

*  तुम्ही नाटक, मराठी मालिका, हिंदी मालिका यांच्यात कामे केली. परंतु, एक कलाकार म्हणून प्रत्येकाची ओळख थिएटरपासूनच होते. रंगमंचावरच कलाकार खरा घडतो. याविषयी काय सांगाल? 
- रंगमंचावरच कलाकार खरा घडतो, याच्याशी मी अतिशय सहमत आहे. मी शाळा-कॉलेजमध्ये असताना फार काही मला नाटकांमध्ये कामं करता आली नाहीत. मात्र, हो, आता जर मला एखाद्या नाटकाची संहिता मिळाली तर मी नक्कीच क रेन. 

* एखादा अ‍ॅवॉर्ड कलाकाराचे खरे मुल्यमापन करतो का? तसेच प्रेक्षकांची दाद कलाकारासाठी किती महत्त्वाची असते?
- प्रेक्षकांची दाद सगळयांत जास्त महत्त्वाची असते. कारण, प्रेक्षकच आहेत जे तुमच्या चुका दाखवून देतात आणि तुमची कौतुकाने पाठ देखील थोपटतात. आणि हो एखाद्या अ‍ॅवॉडने गौरविले जाणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते कारण ते नॉमिनेशन झाल्यावर अ‍ॅवॉर्डसाठी जे वोटिंग होते त्यात प्रेक्षकांसोबत काही मान्यवर परीक्षकही असतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत.

* वेबसीरिज हे माध्यम नव्या रूपाने प्रेक्षकांसमोर आले आहे. संधी मिळाल्यास त्यात काम करायला आवडेल का? 
- सोशल मीडिया हे माध्यम सध्याच्या काळात खूप प्रभावी असल्याचं सिद्ध होत आहे. रसिक चाहत्यांसोबत या माध्यमातून जास्तीत जास्त कनेक्ट होण्याची संधी आम्हा कलाकारांना मिळत असते. वेबसीरिज हे नवे माध्यम प्रेक्षकांच्या समोर आले आहे. नक्कीच हे अतिशय उत्तम माध्यम आहे. संधी मिळाल्यास काम करायला नक्की आवडेल.

Web Title: Out of the Comfort Zone, Harshada Khanvilkar needs to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.