Parth Bhalerao: गोमंतकीय प्रेक्षकांच्या प्रेमाने भारावून गेलो, पार्थ भालेराव याचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 11:23 PM2022-08-07T23:23:26+5:302022-08-07T23:24:14+5:30
Parth Bhalerao:
- समीर नाईक
पणजी - पिल्लू बॅचलर या चित्रपटामुळे मला पहिल्यांदाच गाेवा मराठी चित्रपट महोत्सवात येण्याची संधी मिळाली. पिल्लू बॅचलर हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, परंतु पहिल्यांचा या चित्रपटाचा प्रिमीयर गोव्यात होत असल्याने खुप आनंद होत आहे. गोमंतकीय प्रेक्षकांनी आतापर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांना मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून आपले प्रेम दाखवून दिले आहे, आणि पिल्लू बॅचलरला देखील त्यांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, त्यामुळे मी खुप भारावून गेलो आहे, असे मत अभिनेता पार्थ भालेराव यांनी लाेकमतकडे व्यक्त केले.
पिल्लू बॅचलर चित्रपट खुप धम्माल आहे, तसेच काही सामाजिक संदेश यामध्ये आहे. या चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, सायली संजीव, सशांक शेंडे यासारख्या दिग्गज कलाकरांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. सुरुवातीला खुप दडपण होते, परंतु या मोठ्या मनाच्या कलाकरांनी मला सांभाळून घेतले आहे. अनेक चांगले क्षण या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवयास मिळाले, असे पार्थने पुढे सांगितले.
माझा कौल नेहमीच कॉमेडी, किंवा बिंदास, राऊडी पात्र साकारण्याकडे राहीला आहे, त्यामुळे माझे या पत्रकारचेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गंभीर पात्र देखील मी भविष्यात करण्याचा विचार करत आहे, माझा अशाप्रकारचा एक चित्रपट देखील लवकर येणार आहे, जो गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केला आहे, असे पार्थ यांनी पुढे सांगितले.
गोव्याचे खाद्य संस्कृती मनाला भावते
गोवा हा सर्वांचाच प्रिय आहे. यापूर्वी इफ्फीमध्ये मी आलो होतो. परंतु मराठी चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच यायचा योग आला. मित्रांसोबत अनेकदा येथे फिरायला आलाेय, यंदा इफ्फीमध्ये देखील संधी मिळाली तर निश्चितच येऊ. गोव्यातील वातावरण मला खुप आवडते, आणि खासकरुन येथील खाद्य संस्कृती मला खुप भावते. अनेक दर्जेदार पदार्थ येथे मिळतात, आणि हे मी कधीच चुकवीत नाही, असे पार्थ भालेराव यांनी गोव्याबद्दल बोलताना सांगितले.