'पाणी' सिनेमाचा खरा 'हिरो' हनुमंत केंद्रे यांची काय प्रतिक्रिया होती? आदिनाथ कोठारे म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:16 PM2024-10-16T15:16:36+5:302024-10-16T15:17:14+5:30
'त्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं आणि मला...', आदिनाथ कोठारे भावुक झाला
'पाणी' (Paani) हा आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) दिग्दर्शित आणि अभिनीत सिनेमा १८ ऑक्टोबरला रिलीज होतोय. गावात पाणी नाही म्हणून ज्याला मुलीने लग्नासाठी नकार दिला तिच्यासाठी गावात पाणी आणणाऱ्या अवलियाची ही गोष्ट सिनेमात मांडण्यात आली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. खऱ्या आयुष्यात ज्याने हे काम केलंय त्या अवलियाची सिनेमावर काय प्रतिक्रिया होती याचा खुलासा नुकताच आदिनाथ कोठारेने केला.
'पाणी' ही हनुमंत केंद्रे यांची कथा आहे. नांदेडचे हनुमंत हे राज्यात 'जलदूत' म्हणून ओळखले जातात. आदिनाथ कोठारे त्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हनुमंत केंद्रे यांचे मराठवाड्यातील दुष्काळी भागातील अनोखं कार्य या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमा पाहून हनुमंत केंद्रे यांची काय प्रतिक्रिया होती? यावर आदिनाथ कोठारे 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "सिनेमाच्या रिलीज डेटसंदर्भात मोठा इव्हेंट आम्ही आयोजित केला होता. या इव्हेंटसाठी आम्ही हनुमंत केंद्रे आणि सुवर्णा केंद्रे यांना खास नांदेडवरुन बोलवून घेतलं होतं. हनुमंत यांनी आधीच सिनेमा बघितला होता तेव्हा ते भारावून गेले. इव्हेंटनंतर हनुमंतजी माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते म्हणाले, 'आम्ही गावात पाणी आणण्यासाठी जेवढा स्ट्रगल केला तितकाच तुम्ही हा सिनेमा बनवण्यासाठी केला आहे.' तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं हे पाहून माझाही कंठ दाटून आला होता. थेट त्यांच्याकडूनच ही पावती मिळाली ही खूप मोठी गोष्ट होती.
'पाणी' मध्ये आदिनाथसोबत अभिनेत्री गौरी वैद्य मुख्य भूमिकेत आहे. तसंच सुबोध भावे, किशोर कदम हे देखील आहेत. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ मधु चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याशिवाय महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा हे या प्रकल्पाचे सहयोगी निर्माते आहेत. विशेष म्हणजे आदिनाथनेच सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. १८ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.