"वाराणसीची पहाट, कडाक्याची थंडी, गंगा स्नान अन्..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला दैवी अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 12:21 IST2024-12-01T12:20:42+5:302024-12-01T12:21:58+5:30
पछाडलेला फेम अभिनेत्रीने तिला आलेला विलक्षण अनुभव सोशल मीडियावर शेअर केला

"वाराणसीची पहाट, कडाक्याची थंडी, गंगा स्नान अन्..."; मराठी अभिनेत्रीने सांगितला दैवी अनुभव
'पछाडलेला' सिनेमा सर्वांनी पाहिला असेलच. या सिनेमात श्रेयस तळपदेच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने. अश्विनी सध्या विविध मराठी सिनेमांमध्ये अभिनय करत आहे. अश्विनीनेच नुकतंच सोशल मीडियावर तिला आलेल्या दैवी अनुभवाबद्दल सांगितलंय. अश्विनी लिहिते, "आयुष्यात कधी कोणत्या मनोकामना देव कसा पूर्ण करेल सांगता येत नाही.. पण जेव्हा ती इच्छा पूर्ण होते.. तेव्हा जाणवतं देवाचा हात आहे पाठीवर.. नाव लौकिक पैसा वैभव हे येत जात राहते.. पण "त्या" च्या वर ची श्रद्धा ढळली नाही ना.. तर असे सुंदर अनुभव "तो" वाटेवर घेऊन उभा असतो.. गंगा स्नान.."
अश्विनी पुढे लिहिते की, "गंगा स्नान.. म्हणलं तर किती साधी सोपी इच्छा.. पण ती पूर्ण होण्यासाठी आज इतकी वर्ष वाट पहावी लागली.. पण ती इतक्या सुंदर आणि समाधानी स्वरूपात पूर्ण होईल याची कल्पनाही मी केली नव्हती.. वाराणसी ची सुंदर पहाट.. मी म्हणणारी थंडी... दाटलेले धुके... या सगळ्यांना सामोरे जात गंगा आई ने कधी कुशीत घेतले समजले पण नाही.. कडाक्याच्या थंडीत मायेची उब दिली.. दाटलेल्या धुक्यात स्वतःची स्पष्ट ओळख करून दिली.. आणि त्यात धुके सारत येणाऱ्या सूर्य देवाने अत्यंत लोभस असे दर्शन घडवले.. या सुंदर अनुभूती साठी देवाचे शत शत आभार.."
अश्विनी शेवटी लिहिते की, "इच्छा अपेक्षा कराव्या त्या फक्त देवाकडून.. तो अनपेक्षीत रित्या लाड करून त्या पूर्ण करतो.. आणि अशा क्षणी, या सुंदर उदात्त सांस्कृतित जन्माला घातलं म्हणून देवाचे अजूनच उपकार वाटू लागतात ..आपल्या अस्तिकतेचे, श्रद्धेचे सार्थक झाल्या सारखे वाटते.. आता मी हक्काने सांगू शकते.. मी गंगेच लेकरू आहे.. तिने खूप प्रेमाने मला कुशीत घेतलं.. आणि या दैवी अनुभवासाठी त्या काशी विश्वनाथ समोर मी आजन्म ऋणी आहे.. हर हर गंगे..."