'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' दोन वेबसिरिज येणार रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:37 AM2019-09-17T10:37:48+5:302019-09-17T10:42:08+5:30
कॉलेजमध्ये होणाऱ्या मैत्रीपासून ते प्रेमाची जाणीव होईपर्यंतचे सर्व अनमोल आणि अविस्मरणीय क्षण यात बघता येतील.
दोन नवीन भन्नाट मराठी ओरिजनल्स वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणाऱ्या या दोन्ही वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या वेबसिरीज २० सप्टेंबरपासून आपल्याला विनामूल्य बघता येणार आहेत. अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित 'पांडू' ही वेबसिरीज पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित आहे. सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के या दोन धाडसी पोलिसांची ही कथा आहे, जे आपले शहर सुरक्षित राहावे, म्हणून सदैव तत्पर असतात. या वेबसिरीजमध्ये पोलिसांच्या रोजच्या जीवनाचे चित्रण अतिशय रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.
या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक सारंग साठे सांगतात, "मुंबई सारख्या मोठ्या शहराचे रक्षण करणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे हे व्रत आचरणात आणावे लागते. मुंबईसारख्या शहराचे रक्षण करण्यासाठी धाडसी आणि निडर मन असावे लागते. आपल्या मुंबई पोलिसांमध्ये हे सर्व गुण आहेत. म्हणूनच आपण आपल्या घरात, शहरात सुरक्षित आहोत, याची जाणीव करून देण्यासाठी ही सर्व मंडळी रात्रंदिवस झटत असतात. ही कथा माझ्या खूप जवळची असण्याचे आणखी एक कारण म्हणजे यात स्त्री आणि पुरुष पोलीस खाकी वर्दी असताना आणि नसताना त्यांचे जीवन कसे असते, याचे दर्शन घडते. सरतेशेवटी पोलीस सुद्धा तुमच्या आमच्या सारखा एक माणूसच आहे. पोलिसांच्या न पाहिलेल्या आयुष्याचा आढावा अतिशय रंजक पद्धतीने या वेबसिरीजच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. ''
'वन्स अ ईअर' या वेबसिरीजमध्ये प्रेमाला मिळालेले एक अद्भुत वळण पाहायला मिळणार आहे. मंदार कुरुंदकर दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका असून सहा भागांच्या या वेबसिरीजमध्ये या दोघांच्या प्रेमाचा सहा वर्षांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या मैत्रीपासून ते प्रेमाची जाणीव होईपर्यंतचे सर्व अनमोल आणि अविस्मरणीय क्षण यात बघता येतील. या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक मंदार कुरुंदकर म्हणतात, "कोणत्याच प्रेमकथेची सुरुवात ही पहिल्याच नजरेत होत नाही. कोणीही पहिल्याच भेटीत आपल्या शाश्वत प्रेमाची कबुली देत नाही. यासाठी काही काळ जावा लागतो. या वेबसिरीजमध्ये एका जोडप्याच्या जीवनात त्यांचे प्रेम प्रत्येक टप्यावर कसे फुलत जाते आणि अधिक मजबूत होते, हे पाहायला मिळेल.
या वेबसिरीजमध्ये काम करण्याच्या अनुभवाबद्दल निपुण सांगतो, "माझा प्रेमावर खूप विश्वास आहे. या वेबसिरीजमधून आपल्याला दोन व्यक्तींच्या प्रेमाचा सहा वर्षांचा चढ-उतारांनी भरलेला प्रवास पाहायला मिळणार आहे. त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या सवयी आणि त्यांचे मतभेद सुद्धा यात पाहायला मिळतील. मला विश्वास आहे, की जी जोडपी आता प्रेमात आहेत त्या सर्वांच्या या सोनेरी काळाला नक्कीच ही वेबसिरीज जोडली जाईल."