'या' वेबसिरीजच्या शूटिंगसाठी मुहूर्तच मिळेना, कलाकारही झाले होते त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:25 PM2019-10-01T16:25:59+5:302019-10-01T16:27:13+5:30

अथक प्रयत्नानंतर अखेर चौथ्या दिवशी ठरलेल्या शेड्युलनुसार चित्रीकरण पार पडले, ते ही उत्तमरित्या आणि अपेक्षित अशा सर्व गोष्टी या भागात आम्हाला दाखवता आल्या.

Pandu Marathi Webseries | 'या' वेबसिरीजच्या शूटिंगसाठी मुहूर्तच मिळेना, कलाकारही झाले होते त्रस्त

'या' वेबसिरीजच्या शूटिंगसाठी मुहूर्तच मिळेना, कलाकारही झाले होते त्रस्त

googlenewsNext

सारंग साठ्ये आणि अनुषा नंदा कुमार दिग्दर्शित ‘पांडू’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. पोलिसांच्या जीवनावर आधारित ही वेबसिरीज सहा भागांची असून, यात पोलिसांच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. या वेबसेरीजच्या प्रमोशनदरम्यान दिग्दर्शक सारंग साठ्ये याने चित्रीकरण करताना घडलेले काही किस्से सांगितले. त्यातलाच एक सारंगला कायम स्मरणात राहील, असा किस्सा म्हणजे शेवटच्या भागाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला किस्सा. या वेबसिरीजचा शेवटचा भाग 'भारत बंद' या विषयावर आधारित आहे. याबद्दल सारंग सांगतो, "जेव्हा आम्ही या भागाचे चित्रीकरण सुरु केले तेव्हा अनेक अनिश्चित आणि मजेशीर गोष्टी घडत गेल्या तर काही योगायोगही घडले. खरंतर ज्या दिवशी हा भाग चित्रित करायला सुरुवात केली. नेमका त्याच दिवशी खरोखरच 'भारत बंद' होता. त्यामुळे आमचे पहिल्या दिवसाचे शूटिंग रद्द करावे लागले. 


आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा चित्रीकरणाची तयारी केली, मात्र त्यादिवशी आदल्या दिवशी झालेल्या 'भारत बंद'चा निषेध म्हणून बंद पाळण्यात आला. पुन्हा एकदा चित्रीकरण रद्द करावे लागले. तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही चित्रीकरणाची तयारी केली तेव्हा आम्हाला शूटिंगसाठी आवश्यक असलेली पोलीस व्हॅनच उपलब्ध  नव्हती. आम्ही बुक केलेली व्हॅन दोन दिवस शूटिंग रद्द झाल्याने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या चित्रीकरणासाठी देण्यात आली होती. पुन्हा एकदा आमचे चित्रीकरण रद्द झाले. सलग तीन दिवस शूटिंग रद्द झाल्याने खरंतर आम्ही खूप त्रस्त झालो होतो. 


अथक प्रयत्नानंतर अखेर चौथ्या दिवशी ठरलेल्या शेड्युलनुसार आमचे चित्रीकरण पार पडले, तेही उत्तमरित्या आणि अपेक्षित अशा सर्व गोष्टी या भागात आम्हाला दाखवता आल्या. हा प्रसंग खरंतर आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी हसावे की रडावे, अशी आमची स्थिती झाली होती. मात्र या अनुभवातून खूप गोष्टी शिकता आल्या.  'पांडू' या वेबसिरीजमध्ये सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका असून या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 
 

Web Title: Pandu Marathi Webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.