"आता गोल्ड मेडलच पाहिजे", विनेश फोगाटची फायनलमध्ये धडक, मराठी अभिनेत्याचा सत्ताधाऱ्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 09:28 AM2024-08-07T09:28:57+5:302024-08-07T09:29:22+5:30
Paris Olympics 2024 Vinesh Phogat : विनेश फोगाटने ५० किग्रॅ वजनी गटाच्या कुस्तीत थेट फायनलमध्ये धडल मारली आहे. विनेश फोगाटच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर हेमंत ढोमेने खास पोस्ट शेअर केली आहे.
Paris Olympics 2024: भारतीय प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) इतिहास रचला आहे. विनेश फोगाटनं फायनलमध्ये एन्ट्री घेत भारतासाठी आणखी एक मेडल पक्कं केले आहे. मंगळवारी महिला मॅटवरच्या कुस्तीत ५० किग्रॅ वजनी गटात फ्रीस्टाईल इव्हेंटमध्ये सेमीफायनलमध्ये क्यूबाची रेसलर युसनेइलिस गुजमैनला ५-० नं दारुण पराभव करत तिने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. विनेश फोगाटच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. मराठी अभिनेता हेमंत ढोमेने विनेशसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
हेमंतने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन विनेश फोगाटसाठी काही स्टोरी शेअर केल्या आहेत. विनेशचा कुस्तीपटूंच्या आंदोलनातील आणि ऑलिम्पिकमधील फोटो शेअर केला आहे. "सत्याचा आणि निश्चयाचा कायम विजय होतो. खूप खूप शुभेच्छा विनेश...या देशाला आम्हा सगळ्यांना आपला अभिमान आहे, आता गोल्ड मेडलच पाहिजे", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. त्यानंतर विनेश फोगाटचा सेमी फायनलमधील फोटो शेअर करत त्याने आणखी एक स्टोरी शेअर केली आहे. "सारे जहां पे भारी भारत की बेटी...हे सुवर्ण भारतासाठी सोनं घेऊन येईल", असं त्याने म्हटलं आहे.
त्यानंतर हेमंतने आणखी एक पोस्ट शेअर करत भाजपा आणि सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. "जेव्हा ती लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन करत होती तेव्हा कोणीही तिची स्टोरी सोशल मीडियावर शेअर करण्यास इच्छुक नव्हतं हे विसरू नका", असं हेमंतने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गेल्यावर्षी भारताच्या कुस्तीपटूंनी कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. तेव्हा या कुस्तीपटूंवर लाठीचार्ज करण्यात आला होता.
दरम्यान, आता विनेश बुधवारी(७ ऑगस्ट) सुवर्ण पदासाठी खेळणार आहे. ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली आहे. विनेश फोगाटच्या फायनलमधील एन्ट्रीनं तिच्याकडे गोल्ड मेडल जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. विनेशचा आता अंतिम लढतीत अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी सामना होणार आहे, जिनं २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. विनेशच्या फायनलमधील एन्ट्रीमुळे भारताच्या सुवर्णपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.