‘पाटील’ हा समाजातील नायक : दिग्दर्शक संतोष मिजगर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 02:18 PM2018-10-22T14:18:21+5:302018-10-22T14:22:48+5:30
‘पाटील - ध्यास स्वप्नांचा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच विविधांगी विषय हाताळले जात असतात, ज्यांची प्रशंसा आंतरराष्ट्रीय पातळीवरही केली जाते. ‘पाटील - ध्यास स्वप्नांचा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. प्रचंड मेहनत करून दिग्दर्शक बनलेल्या संतोष राममीना मिजगर यांनी दिग्दर्शनासोबतच ‘पाटील’ मध्ये शीर्षक भूमिकाही साकारली आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा. लि., सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा. लि. निर्मित ‘पाटील’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संतोष मिजगर यांनी चित्रपट बनवण्याचं पाहिलेलं स्वप्न ‘पाटील’च्या माध्यमातून साकार झालं आहे. दिग्दर्शन आणि अभिनयासोबतच संतोष मिजगर यांनी या चित्रपटाची कथा, पटकथाही लिहीली आहे. बॉलीवूड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सुरुवातीच्या काळात मुंबईत आल्यानंतर वॅाचमनची नोकरी करून उदरनिर्वाह करत नंतर कुरियर, हॅाटेल व्यवसाय, ट्रॅव्हल्स, इव्हेन्ट मॅनेजमेंट असा व्यवसायाचा व्याप वाढवत मिजगर आज चित्रपटाचे नायक आणि दिग्दर्शक बनले आहेत. या चित्रपटाबद्दल बोलताना मिजगर म्हणाले की, ‘पाटील’ या चित्रपटाचं स्वप्न साकार करण्याचा प्रवास खूपच खडतर होता. नांदेडला चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशीच नोटाबंदी जाहिर झाल्याने खूप मोठी अडचण उभी राहिली. त्यावेळी नातेसंबंधांपेक्षा जवळचे असणारे मित्र मदतीला धावून आले आणि अनेक अडीअडचणींवर मात करत अखेर ‘पाटील’ हा चित्रपट तयार झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीयजी यांचीही मोलाची साथ लाभली.
‘पाटील’ हा चित्रपट केवळ एक स्वप्न नसून हा एक विचार असल्याचं सांगत संतोष मिजगर म्हणाले की, ‘आजवर मराठी चित्रपटाच्या पडद्यावर पाटील हा नेहमी खलनायक म्हणूनच चितारण्यात आला आहे. पाटील खलनायक नसून, नायक असल्याचं चित्र समाजमनावर रेखाटण्याचं काम हा चित्रपट करेल याची खात्री आहे. आई-वडील आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात. त्यांच्यासाठी स्वप्न पाहतात. ती स्वप्न साकार करण्याचं कर्तव्य मुलांचं असतं. मुलांनाही आई-वडीलांचं स्वप्न साकार करताना बऱ्याच अडचणी येतात, पण प्रेमाचं मॅटर येतं तेव्हा एक वेगळाच पेच उभा राहतो. अशा वेळी काय करायला हवं ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
मिजगर यांचा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे. ज्या इमारतीत वॅाचमनकी केली तिथेच आज त्यांचं ऑफिस आहे. ज्या फिल्मसिटीमध्ये त्यांना प्रवेश नाकारला होता, आज तिथे गेल्यावर सुरुवातीलाच त्यांचं ऑफिस आहे. यामागे प्रचंड जिद्द आणि चिकाटी आहे. दिग्दर्शक बनण्याआधी त्यांनी पितांबर काळेंसोबत ‘लग्नाचा धुमधडाका’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. याखेरीज बालाजी टेलिफिल्म्ससाठीही काही काळ काम केलं. यातून जो अनुभव गाठीशी आला त्यातून त्यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारत समाजाला प्रबोधन करणारं कथानक लिहिलं. या चित्रपटातील शीर्षक भूमिकेसाठी कोणताही शिक्का नसलेला चेहरा हवा असल्याने स्वत:च नायकाच्या भूमिकेत उभे ठाकले.
संतोष मिजगर यांच्या जोडीला या चित्रपटात शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांसोबत डॉ. जगदीश पाटील (कोकण आयुक्त), झी टीव्हीचे सुभाषचंद्र गोएंका विशेष भूमिकेत दिसणार आहेत.