पाटील...एका जिद्दीचा प्रवास रूपेरी पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 08:00 AM2018-12-30T08:00:00+5:302018-12-30T08:00:00+5:30
आपल्या स्वप्नपूर्तीसाठी झटणाऱ्या संतोष मिजागर यांच्या पाटील चित्रपटातही स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास पहायला मिळणार आहे.
स्वप्नांचा प्रवास कधीच सोपा नसतो. क्षणोक्षणी निर्णय घेत, मेहनत करत, स्वप्नं कशी प्रत्यक्षात आणायची हे दाखवून देणाऱ्या दिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या चित्रपट स्वप्नपूर्तीची कहानीही एखाद्या चित्रपटासारखीच आहे. संतोष राममीना मिजगर यांना सिनेमाविषयी प्रचंड प्रेम आणि आकर्षण होतं. या वेडापायी त्यांनी लहानपणापासून अनेक सिनेमे पहायला सुरुवात केली. गावाकडच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झालेल्या संतोष यांच्या घरात सिनेक्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती; पण संतोष मिजगर यांना सिनेमात काम करण्याची प्रचंड इच्छा होती. चित्रपटसृष्टी ही मोहमयी दुनिया आहे, असे म्हणतात. या दुनियेत संघर्षाची वाटचाल करावी लागते तरच येथे टिकून राहता येते. हा संघर्ष संतोष मिजगर यांना ही चुकला नाही. सिनेमाच्या वेडापायी त्यांनी मुंबई गाठली.
मुंबईत सुरुवातीला पदरी निराशाच पडली. गोरेगावच्या चित्रनगरीत सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारल्यानंतर याच चित्रनगरीत मानाने प्रवेश करीन असा निश्चय करणाऱ्या संतोष यांनी स्व:ताच्या जिद्दीने कंपनी स्थापन केली. आज योगायोगाने चित्रनगरीचं फिल्म टूर काढण्याच कंत्राट संतोष यांच्या कंपनीकडेच आहे. यानंतर संतोष यांनी कधी मागे वळून बघितलं नाही. प्रचंड स्ट्रगल करत त्यांनी सिनेसृष्टीचा प्रवास सुरु केला. बालाजी टेलिफिल्म्स यासारख्या अनेक कंपन्यामध्ये त्यांनी छोटी-मोठी कामे करायला सुरुवात केली. इतका संघर्ष केल्यानंतर संतोष मिजगर यांनी स्वत:चा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अनेक प्रयत्नानंतर अखेर मनाची इच्छा पूर्ण झाली, ती ‘पाटील’ च्या दिग्दर्शनातून. आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आपल्या स्वप्नपूर्तीसाठी झटणाऱ्या संतोष मिजागर यांच्या पाटील चित्रपटातही स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास पहायला मिळणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. निर्मित ‘पाटील संघर्ष... प्रेम आणि अस्तित्वाचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा संघर्षमय प्रवास मांडला आहे. कर्तव्य आणि प्रेम या दोन गोष्टींची सांगड घालत शिवाजी पाटील यांचा भूतकाळ, संघर्ष, त्यांनी पचवलेले दुःख, अपमान आणि त्यानंतर ही परिस्थितीसमोर हार न मानता तिला धीराने उत्तर देण्याची त्याची जिद्द समोर येणार आहे.
संतोष राममीना मिजगर लिखित-दिग्दर्शित, पाटील चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.