'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहातच रसिकांना पाहायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:11 AM2021-06-10T11:11:26+5:302021-06-10T11:15:48+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा 'पावनखिंड' हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.

'Pavankhind' Marathi Movie Release Only In Theaters This Year | 'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहातच रसिकांना पाहायला मिळणार

'पावनखिंड'चा थरार चित्रपटगृहातच रसिकांना पाहायला मिळणार

googlenewsNext

गेल्या वर्षभरापासून कोरोनानं जगभर कहर माजवला आहे. या वर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपला देश सावरण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी लावण्यात आलेल्या लॅाकडाऊनच्या पार्श्वभूमीवरील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. असं असलं तरीही अद्याप राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा 'पावनखिंड' हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.

 

शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं 'पावनखिंड' नाव पडलं. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला लढा पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

चित्रपट सर्वार्थानं तयार आहे, पण कोरोनाचं सावट अद्याप गडद असल्यानं रसिकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे. सिनेमागृहांचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याचे आदेश मिळताच 'पावनखिंड'च्या प्रदर्शनाची योजना आखण्यात येणार असून, या चित्रपटातील वैशिष्ट्यं टप्प्याटप्प्यानं रसिकांसमोर येणार आहेत. ए.ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या 'पावनखिंड' या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरूद्ध आरेकर यांनी केली आहे.

 

'पावनखिंड' हा चित्रपट दिग्पालनं संकल्प केलेल्या 'शिवराज अष्टका'तील तिसरं पुष्प आहे. या पुष्पमालेतील 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. लवकरच पावनखिंडीतील तो थरार आणि पराक्रम सिनेरसिकांना चित्रपटगृहांमध्ये अनुभवायला मिळणार आहे.

Web Title: 'Pavankhind' Marathi Movie Release Only In Theaters This Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.