" प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं...", पावनखिंड’ फेम दिग्दर्शकानं सरसंघचालकांबाबत केलेली पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:07 PM2022-08-01T12:07:43+5:302022-08-01T12:21:11+5:30
दिग्पाल लांजेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ या सारख्या ऐतिहासिक सिनेमा दिग्पाल लांजेकर यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहास प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम ते चोखपण करतात. दिग्पाल त्यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. सध्या त्यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या दिग्पाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी पोस्ट लिहिली आहे.
दिग्पाल लिहितात, आशीर्वाद २ “रेशीमबाग” या ठिकाणी जाण्याचं ... ती वास्तू अनुभवण्याचं ... प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं... आणि या सगळ्यात तुम्हाला संघाच्या कुटुंबप्रमुखांचा म्हणजेच सरसंघचालकांचा सहवास लाभणार असेल तर ? बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या मला आणि माझा बंधू निखिल याला हीच पर्वणी मिळाली २५ आणि २६ जुलैला... या दोन दिवसातले काही क्षण नव्हे तर काही तास माझ्या आयुष्याला सुवर्ण अनुभवाचे दान देऊन गेले.
शिवराज अष्टकातील चौथे पुष्प शेर शिवराज रिलीझ झाला आणि मला संघाचे प्रचारक मा. यशोवर्धन वाळींबे यांचा फोन आला. “ अरे मा. मोहनजींनी (मा. मोहनजी भागवत) २५ आणि २६ जुलैला रेशीमबाग येथे “पावनखिंड” आणि “शेर शिवराज – स्वारी अफझलखान” हे दोन्ही चित्रपट पाहता येतील का?” प्रत्यक्ष सरसंघचालक ... आपली कलाकृती पाहणार ? अधीरता .. उत्सुकता... आणि काहीसा सुखद तणाव ... सगळ्या भावनांचा कल्लोळ घेऊन आम्ही नागपूर ला पोचलो ... मी , मृणालताई, अजयदादा , निखिल, राजवारसा प्रॉडक्शन्स चे निर्माते प्रद्योतजी पेंढरकर, अनिलराव वरखडे आणि क्रिएटिव्ह हेड प्रसादजी कुऱ्हे... २५ तारखेला रेशिमबागेत दाखल झालो... पू. डॉक्टरांच्या आणि श्रीगुरूजींच्या समाधीचं दर्शन घेतलं… त्यानंतर पावनखिंड चं प्रदर्शन करण्यात आलं ... ही कलाकृती पाहताना काहीजणांना भाषा कळत नव्हती ... पण भावना सगळ्यांना भिडत होती... शेवटी बाजीप्रभू आणि बांदल वीरांच्या त्यागाने बलिदानाने भावविभोर झालेल्या त्या देशभक्त कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
मा. मोहनजींनी दुसऱ्या दिवशी न्याहारीला भेटण्याचा निरोप दिला आणि भारावलेल्या मनानं आम्ही रेशिमबाग सोडली. २६ जुलैला संस्कारभारतीचे अध्यक्ष मा. दादा गोखले यांनी एक वेगळेच सरप्राईझ दिले ... एक सुंदरशी शाल आणि डबीभर शुद्ध केशर ! ... या नंतर शेर शिवराज या चित्रपटाचे प्रदर्शन झाले... आम्ही प्रतिक्रीयेच्या अपेक्षेनं मा. मोहनजींकडे पाहिलं... ते म्हणाले “या कलाकृतींमधून वंदनीय शिवचरीत्र साकारून तुम्ही राष्ट्रीय कार्य करत आहात... हे कार्य असंच चालू ठेवा...” सहजपणे पाठीवर एक शाबसकी देऊन मोहनजी पुढच्या बैठकीला निघून गेले... या शाबासकीचा आनंद मनात घोळवत असतानाच एक वाक्य रूंजी घालत होतं...“इदं न मम ... इदं राष्ट्राय ... इदं शिवराजाय ...” श्री छत्रपती शिवरायर्पणमस्तु ...भारत माता की जय...'' दिग्पाल यांची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होते आहे.