राजकारण्यांच्या सिनेमांना सिक्वेलचे वेध! 'धर्मवीर २' वरून नवा ट्रेंड येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 11:36 PM2023-11-28T23:36:37+5:302023-11-28T23:37:28+5:30
राजकीय आखाड्यात उतरणारे दिग्गज चेहरे चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकू लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - आपल्याकडे राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांवर बरेच सिनेमे बनले आहेत. देश तसेच राज्यांच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुढाऱ्यांवर ठराविक अंतराने सिनेमे येत आहेत, पण या सिनेमांना आता सिक्वेलचे वेध लागले आहेत. आनंद दिघे यांच्यावरील 'धर्मवीर २' देखील रसिकांच्या पसंतीस उतरल्यास भविष्यात राजकारण्यांवरील सिनेमांच्या सिक्वेलचा ट्रेण्ड येण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
रिचर्ट अॅटनबरो यांच्या १९८२ मध्ये आलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींवरील 'गांधी' सिनेमाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर गारूड केल्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय आखाड्यात उतरणारे दिग्गज चेहरे चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकू लागले. हा जरी गांधीजींचा चरित्रपट असला तरी तो राजकीयपटही मानला जातो. आजवर पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, यशवंतराव चव्हाण, जयललिता, गोपीनाथ मुंडे, सरदार वल्लभभाई पटेल अशा बऱ्याच राजकीय नेत्यांवर चित्रपट आले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचा जीवनप्रवास दर्शवणारा 'मैं अटल हूं' जानेवारीमध्ये येणार आहे, पण 'धर्मवीर' या मराठी सिनेमासारखे यश फार कमी चित्रपटांच्या नशीबी आले.
लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडेने यात राजकारणासोबत त्यांच्या जीवनातील वास्तव असे काही मनोरंजकरीत्या दाखवले की, संवादांपासून गाण्यांपर्यंत सारे काही हिट झाले. याच बळावर 'धर्मवीर २'ची घोषणा करण्यात आली आहे. कोणत्याही राजकारण्यावरील चित्रपटाचा हा पहिला सिक्वेल आहे. या चित्रपटाला तिकिटबारीवर भरघोस यश मिळाले तरी भविष्यात आणखी काही लेखक-दिग्दर्शक सिक्वेलचा विचार करून राजकीय चित्रपट काढण्याची तयारी दर्शवतील असे चित्रपट व्यवसायतज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाळासाहेब ठाकरेंवरील 'ठाकरे' या चित्रपटाच्या सिक्वेलचीही चर्चा रंगली, पण चार वर्षे झाली तरी अद्याप काही हालचाल नाही. असे असले तरी सिक्वेल किंवा प्रिक्वेलच्या माध्यमातून यापूर्वी पडद्यावर दिसलेले राजकारणी पुन्हा रसिकांसमोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आजवर खूप राजकारण्यांवर सिनेमे आले, पण ते चालले नाहीत. आनंद दिघे हे राजकारणाच्या पलिकडले असल्याने लोकांना भावले. त्यांच्या आयुष्यात जे घडले ते दाखवल्याने त्यांचा बायोपिक सुपरहिट झाला. राजकारण्यांच्या जीवनातही एन्टरटेन्मेंट असते, पण सगळेच दाखवण्याचे धाडस कोण करेल? सगळ्यांनी जे घडले ते दाखवले तर सर्वांचेच सिनेमे सुपरहिट होतील आणि त्यांचे सिक्वेल्सही येतील. जो सिनेमा सुपरहिट होतो त्याचाच सिक्वेल येतो. 'धर्मवीर' सुपरहिट झाल्याने त्याचा सिक्वेल बनत आहे.
प्रवीण तरडे (लेखक-दिग्दर्शक)
'धर्मवीर'कडे रसिकांनी चित्रपट म्हणून पाहिले ही या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे आनंद दिघेंचे व्यक्तिमत्त्व ठाणे-मुंबईची सीमारेषा ओलांडून त्या पलिकडे गेले. सबटायटल्समुळे आज चित्रपट या माध्यमाला कोणतीही सीमा राहिलेली नाही. 'धर्मवीर'चा सिक्वेल बनवण्याचे पाऊल चांगले आहे, पण पहिल्या सिनेमापेक्षा वेगळे काय दाखवणार याची उत्सुकता आहे.
- दिलीप ठाकूर (ज्योष्ठ चित्रपट विश्लेषक)