लग्नानंतर पूजा सावंत पतीबरोबर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, अभिनेत्रीच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 04:05 PM2024-03-05T16:05:49+5:302024-03-05T16:06:06+5:30
पूजा सावंत काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर पूजा पती सिद्धेशसह सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाली.
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणबरोबर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. मोठ्या धुमधडाक्यात पूजाचा लग्नसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पूजा आणि सिद्धेशने सात फेरे घेतले. लग्नानंतर पूजा पती सिद्धेशसह सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाली.
पूजाने सोमवारी(४ मार्च) दादर येथील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी पूजाने निळ्या रंगाची पैठणी नेसली होती. हातात हिरव्या बांगळ्या, कपाळाला कुंकू अशा पारंपरिक पोशाखात पूजा दिसून आली. पण, या सगळ्यात लक्ष वेधलं ते अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने. डिझायनर आणि खड्यांचा ट्रेंड सुरू असताना पूजाने मात्र पारंपरिक डिझाइन असलेल्या मंगळसूत्राला पसंती दिली. काळे मणी आणि दोन वाट्या असलेल्या पूजाच्या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा आहे.
पूजाने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाणबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिने गुपचूप साखरपुडाही केला होता. आता सिद्धेशबरोबर लग्नबंधनात अडकून तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सिद्धेश हा डिस्नी कंपनीत कामाला आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो.