शिंदे कुटुंबातील तारा निखळला; प्रल्हाद शिंदेंच्या नातवाचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 11:34 AM2023-08-03T11:34:46+5:302023-08-03T11:36:00+5:30
Sarthak shinde: सार्थक उत्तम ढोलकी वादक होता. तसंच तो भीमगीतांसाठी विशेष लोकप्रिय होता.
नितीन देसाई, ना. धो. महानोर यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वातून आणखी एक दु:खद माहिती समोर येत आहे. गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे याचं निधन झालं आहे. ३१ जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने सार्थकचं निधन झाल्याचं सांगण्यात येतं.
प्रल्हाद शिंदे यांच्या संपूर्ण कुटुंबाला कलेचा वारसा लाभला आहे. त्यामुळे त्यांच्या घरातील जवळपास सगळेच लोक संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. यात सार्थकदेखील उत्तम ढोलकीवादक होता. सार्थकच्या निधनाची माहिती गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदे याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली. "तुझ्या सारखा कलाकार होणे नाही, तुझी खूप आठवण येईल", असं कॅप्शन देत उत्कर्षने त्याच्या निधनाची माहिती दिली.
स्वरसम्राट प्रल्हाद शिंदेंचे नातू, उत्तम ढोलक वादक सार्थक दिनकर शिंदे यांचे आकस्मित निधन झाले.
— Ganpat Gaikwad (@ganpatgaikwad9) August 1, 2023
प्रत्येक कलाकृतीवर मनापासून दाद देणारा, सतत हसतमुख, उत्तम कव्वाली ढोलक वादक, शिंदे शाहीतील एक चांगला कलाकार 'सार्थक दिनकर शिंदे' हा आज साऱ्यांना सोडून गेला.
तुझ्या कलेच्या रूपाने तु… pic.twitter.com/vTYrPfOdLo
दरम्यान, ढोलकीसह भीमगीतांसाठी प्रसिद्ध असलेल्या सार्थकने नांदेडमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षीच शिंदे कुटुंबाचं नाव एका वर्ल्ड रेकॉर्ड यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं. मोस्ट रेकॉरडेड आर्टिस्ट इन फॅमिली असा मान या कुटुंबाने मिळवला होता.