"मंदिराच्या प्रांगणात कोणी सेलिब्रिटी...", तक्रार करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:41 IST2025-02-25T15:40:02+5:302025-02-25T15:41:09+5:30
प्राजक्ता माळीने दिलं रोखठोक उत्तर, म्हणाली, "अपुऱ्या माहितीमुळे समाजाची दिशाभूल..."

"मंदिराच्या प्रांगणात कोणी सेलिब्रिटी...", तक्रार करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं थेट उत्तर
महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम असतो. यावर्षी देवस्थानकडून अभिनेत्री प्राजक्ता माळीला (Prajakta Mali) तिची कला सादर करण्याचं आमंत्रण मिळालं आहे. मात्र प्राजक्ता माळी सेलिब्रिटी असून देवस्थान यातून चुकीचा पायंडा घालत असल्याचं तक्रारवजा पत्र माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी लिहिलं आहे. याची आज दिवसभरात खूप चर्चा झाली. यावर आता प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला. त्यांनी सांगितलं की,'दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर, नृत्यावर आधारित उत्सव आयोजित करत असतो. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करुन गेले आहेत. फुलवंतीच्या निमित्ताने आम्हाला कळलं की तुम्ही सुद्धा भरतनाट्यम नर्तिका आहात. तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर कराल का?' अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्यदेवता आहे, आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला. "
वादावर दिलं स्पष्टीकरण
"मी इथे आवर्जुन नमूद करु इच्छिते की महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम संपूर्णत: शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या नृत्याचा कार्यक्रम आहे. ज्यांना माहित नसेल त्यांना मी सांगू इच्छिते की मी स्वत: भरतनाट्यम नर्तिका आहे. मी विशारद, अलंकार केलेलं आहे. त्यातच बीए, एमए केलं आहे. तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातील किंतू परंतू काढून टाकावे. समाजाची दिशाभूल करु नये अशी मी त्यांना विनंती करते. एक गोष्ट आवर्जुन सांगायची की देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नसतो. सगळे भक्त असतात. त्याच भक्तीभावाने मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजाच्या चरणी रुजू करणार आहे. अर्पण करणार आहे. म्हणूनच कार्यक्रमाचं नाव शिवार्पणमस्तु असं आहे. अर्थातच वेळेच्या कारणामुळे मी दोनच रचना सादर करणार आहे. बाकी रचना माझे सहकलाकार सादर करतील. मी निवेदन करणार आहे. चेंगराचेंगरी, गर्दीची भीती असेल तर विश्वस्त, पोलिस जो निर्णय घेतील तो सामाजिक भान बाळगत सर्वांवर बंधनकारक असणार आहे. तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे. हर हर महादेव."