"तुम्ही होता म्हणून आज आम्ही..."; प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:28 IST2025-02-19T15:27:29+5:302025-02-19T15:28:25+5:30
प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (prajakta mali)

"तुम्ही होता म्हणून आज आम्ही..."; प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत
आज देशभरात नव्हे तर जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (chhatrapati shivaji maharaj) साजरी केली जात आहे. छत्रपती शिवरायांचे (shivjayanti) विचार आणि त्यांनी दिलेला शौर्याचा अन् धैर्याचा वारसा जपत आज शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
प्राजक्ता माळीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करुन प्राजक्ता लिहिते, "तुम्ही होता; म्हणून आज आम्ही सुखानं हिंदवी स्वराज्यात जगतोय. आणि होय.., तुम्ही आहात आणि राहणारच; आमच्या जगण्यात, आमच्या श्वासात, आमच्या रंध्रारंध्रात.. शेवटच्या श्वासापर्यंत.. तुमच्या आचार-विचारांचा वारसा पुढे नेऊ.. हीच प्रतिज्ञा…"
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा
आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी
धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा।।
श्री समर्थ रामदास स्वामी
राजराजेश्वर हिंदूपदपातशाह गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.."
अशाप्रकारे प्राजक्ता माळीने शेअर केलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्राजक्ताची भूमिका असलेला 'चिकी चिकी बुबुम बुम' सिनेमा २८ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताची भूमिका असलेला 'फुलवंती' सिनेमा २०२४ ला चांगलाच गाजला.