"काही वर्षांपूर्वी माझा ब्रेकअप झाला त्यानंतर...", चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 11:01 AM2024-12-09T11:01:59+5:302024-12-09T11:02:35+5:30
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठीतील सर्वात चर्चेतली आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री. सध्या प्राजक्ता 'फुलवंती' सिनेमाचं यश एन्जॉय करत आहे. या सिनेमातून तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं. प्राजक्ता तिच्या मनमोकळ्या स्वभावासाठीही ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या मनातलं सांगून मोकळी होते. नुकतंच एका चाहत्याच्या प्रश्नावर तिने काही वर्षांपूर्वी झालेल्या ब्रेकअपचा खुलासा केला.
प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी' सेशन घेतलं. यात तिने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. दरम्यान एका चाहत्याने प्रश्न विचारला की, 'तू आर्ट ऑफ लिव्हिंगशी कधीपासून जोडली गेली आहेस? तुझा या संस्थेशी कसा संबंध आला?' या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ता लिहिते, "६ वर्षांपासून मी आर्ट ऑफ लिव्हिंगशी जोडली गेले आहे. एकासोबत ब्रेकअप झाल्यामुळे मी इकडे वळले. स्वत:ला पु्न्हा उभं करण्यासाठी मी आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सहभागी झाले. मग मला याची सवयच झाली. ही माझी जीवनशैलीच बनली. काहीही झालं की कुठे जायचं त्यासाठी एक हक्काची जागा मिळाली, मला बळ मिळालं आणि आता हीच माझ्यासाठी 'सिद्धी' आहे."
प्राजक्ता माळी अनेकदा आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रसार करताना दिसते. अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या बंगळुरू येथील आश्रमातही ती जाते. तेथे ध्यान करते, अनेक गोष्टी शिकते. रविशंकर यांच्याशी लोक संवाद साधतात, त्यांना प्रश्न विचारतात यातही प्राजक्ता दिसली आहे. 'लग्न करायलाच पाहिजे का?' ते करिअरविषयी तिने रविशंकर यांना प्रश्न विचारले आहेत.