'चिकी चिकी बुबूम बुम’ सिनेमात प्राजक्ताचा वेगळा अंदाज; म्हणाली, "प्रेक्षकांनी आजवर माझ्या..."

By ऋचा वझे | Updated: February 14, 2025 16:21 IST2025-02-14T16:20:45+5:302025-02-14T16:21:49+5:30

प्राजक्ताचा माळीचा आजवर कधीही न पाहिलेला लूक

prajakta mali s different role in next chiki chiki buboom boom marathi movie | 'चिकी चिकी बुबूम बुम’ सिनेमात प्राजक्ताचा वेगळा अंदाज; म्हणाली, "प्रेक्षकांनी आजवर माझ्या..."

'चिकी चिकी बुबूम बुम’ सिनेमात प्राजक्ताचा वेगळा अंदाज; म्हणाली, "प्रेक्षकांनी आजवर माझ्या..."

अभिनय, नृत्य आणि निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali)  स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात ती  रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. रावी ही अतिशय चुलबुली आणि उत्साही आहे  पण त्याचवेळी ती  गोंधळलेली सुद्धा आहे. विनोदाचा वेगळा बाज असलेली ही आव्हानात्मक भूमिका प्राजक्ता साकारत आहे. 

रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट. सिनेमाचा अनुभव सांगताना प्राजक्ता म्हणते, "कसलेल्या विनोदी कलाकारांसोबत काम करण्याची संधी हे माझ्यासाठी खूप खास होतं. माझ्या आजवरच्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून 'चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील माझ्या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील असा मला विश्वास आहे." 

प्राजक्ता माळी सोबत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची  फौज ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात  हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत. 

नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट उडवत २८ फेब्रुवारीला 'चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे.  

Web Title: prajakta mali s different role in next chiki chiki buboom boom marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.