महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीचा कार्यक्रम, माजी विश्वस्तांचा विरोध; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:17 IST2025-02-25T11:15:08+5:302025-02-25T11:17:10+5:30
प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध का? माजी विश्वस्त म्हणाल्या...

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीचा कार्यक्रम, माजी विश्वस्तांचा विरोध; म्हणाल्या...
उद्या महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) कार्यक्रम होणार आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान प्राजक्ता माळी शिवार्पणमस्तु नृत्य सादर करणार आहे. मात्र तिच्या या सादरीकरणाला माजी विश्वस्त ललिती शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे. नक्की काय म्हणाल्या त्या? वाचा.
ललिता शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना रीतसर पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी नमूद केले की, "महाशिवरात्रीचा अतिशय पवित्र दिवस आहे. या दिवशी मंदिरात धार्मिक कार्यक्रमच आयोजित केले पाहिजे. प्राजक्ता माळी जरी शिवस्तुती नृत्य सादर करणार असेल तरी याचा पुनर्विचार व्हावा. मी माजी विश्वस्त आहे. माझं म्हणणं आहे की शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवावं. सेलिब्रिटी अभिनेत्रींना मंदिराच्या प्रांगणात नृत्याविष्कार करायला बोलवणं हा चुकीचा पायंडा देवस्थान ट्रस्टनेसुरु केला आहे. हे चुकीचं घडत आहे. हे आताच थांबलं पाहिजे आणि यात बदल झाला पाहिजे." अशी माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
दरम्यान माजी विश्वस्तांच्या या विरोधानंतर अद्याप देवस्थान ट्रस्ट आणि प्राजक्ता माळी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्ता माळी बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला गेली होती. आता तिचे भीमाशंकर आणि केदारनाथ हे दोनच ज्योतिर्लिंग राहिले आहेत. आता नाशिकमधील कार्यक्रमाला विरोध झाल्यानंतर प्राजक्ता माळीचं नृत्य सादरणीकरण रद्द होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.