'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 11:21 AM2024-05-04T11:21:32+5:302024-05-04T11:21:49+5:30
"खरं तर कौतुकासाठी शब्द अपूरे पडतायेत", प्राजक्ता माळीला नम्रता संभेरावचं कौतुक, 'नाचं ग घुमा' पाहिल्यानंतर खास पोस्ट
सध्या 'नाच गं घुमा' या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. कामवाल्या बाईचं विश्व दाखवणारा आणि तिची कथा सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत पोस्ट शेअर करत आहेत. आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'नाच गं घुमा' सिनेमा पाहिल्यानंतर खास पोस्ट लिहिली आहे. प्राजक्ताने या पोस्टमधून 'नाच गं घुमा' टीमचं आणि खास करून नम्रता संभेरावचं कौतुक केलं आहे.
प्राजक्ताने थिएटरमधील 'नाच गं घुमा' सिनेमा बघतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत ती म्हणते, "निखळ मनोरंजनाबरोबरच काहीना काही विचार देणारे, आपल्या रोजच्या वागण्यात नकळत चांगले बदल घडवून आणणारे चित्रपट मला फार आवडतात. 'नाच गं घुमा' हे काम अतिशय सहजपणे करतो. ज्यांच्या ज्यांच्या घरी मदतनीस आहे...त्यांनी त्यांच्या घरच्यांसहित किंबहुना मदतनीसांसहीतही हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. कधी कधी खो खो हसता हसता डोळ्यात पाणी येईल कळणार नाही. मधू ताईच्या लेखनाविषयी, परेश दादाच्या दिग्दर्शनाविषयी आणि मुक्ताताईच्या कामविषयी; मी पामरानं काय बोलावं. #केवळकमाल #भारीमाणसं".
प्राजक्ताने केलं नम्रता संभेरावचं कौतुक
"आज मला इथे जाहिरपणे कौतुक करायचंय, आमच्या नमूचं. गेली साडेपाच वर्ष हास्यजत्रेत तिचं काम जवळून पाहतेय. तिथेही ती नेहमीच कमाल करते. पण, ह्या चित्रपटात तिने तिचा प्राण ओतलाय. अभिनयातले बारकावे, सहजता, निरागसता, हावभाव, देहबोली…सगळं सगळं एकदम चोख. खरं तर कौतुकासाठी शब्द अपूरे पडतायेत; कारण तिचं काम मोठ्या पडद्यावर पाहणं ही अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे #weekend चा सदुपयोग करा...आणि ही घुमा थेटरात जाऊन बघा", असं प्राजक्ताने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "निर्माते म्हणून स्वप्नील दा आणि शमा ह्यांचं मनापासून कौतुक केल्याशिवाय मला राहवत नाही. (सगळ्यांचे कष्ट मी जवळून पाहिलेत आणि त्याच चीज होतंय हे पाहून मला भारी आनंद होतोय). सारंग साठ्ये, अमित फाळके, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकूळ, शर्मिष्ठा राऊत आणि मधुगंधा कुलकर्णी सगळ्यांनी अफलातून कामं केलीयेत, धमाल आणलीए. मी व @prajaktarajsaaj ह्या चित्रपटाचा भाग आहोत म्हणून नाही तर खरंच खूप दिवसांनी इतका छान सिनेमा पाहिला (पुरावा सेहत जोडलाय..😂; म्हणून एवढा प्रपंच..! नक्की बघा #नाचगंघुमा".
परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' हा सिनेमा १ मेला सर्वत्र प्रदर्शित झाला. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेरावसह या सिनेमात सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'नाच गं घुमा' सिनेमाने तब्बल २ कोटींचा गल्ला जमवला आहे.