बॉलिवूडमध्ये प्रार्थनाला करावा लागला वर्णभेदाचा सामना, सुशांतबरोबरचा सिनेमा हातातून गेला, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 03:07 PM2024-07-27T15:07:46+5:302024-07-27T15:08:44+5:30
सुशांतबरोबर बॉलिवूड सिनेमात झळकणार होती प्रार्थना बेहेरे, ऑडिशनही दिलेलं पण...; शेअर केला अनुभव
प्रार्थना बेहेरे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पवित्रा रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रार्थनाने अभिनयाची छाप पाडली. तर कॉफी आणि बरंच काही या सिनेमाने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. मितवा, फुगे, व्हॉट्स अप लग्न, तुझ्या विन मरजावा, ती आणि ती, रेडीमिक्स अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये प्रार्थना महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. पण, एक मोठा प्रोजेक्ट मात्र प्रार्थनाच्या हातून निसटला. बॉलिवूड सिनेमात प्रार्थनाची वर्णी लागता लागता राहिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याचा किस्सा सांगितला.
पवित्र रिश्ता संपल्यानंतर प्रार्थनाला बॉलिवूड सिनेमाची ऑफर मिळाली होती. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार होती. या सिनेमासाठी तिने ऑडिशनही दिलं होतं. पण, एका कारणामुळे तिला ही भूमिका नाकारण्यात आली. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने या रिजेक्शनबद्दल सांगितलं. प्रार्थनाला काय पो छे या सुशांतच्या सिनेमात झळकण्याची संधी होती. पण, तिला रिजेक्ट करण्यात आलं. रिजेक्शनचा हा अनुभव सांगत ती म्हणाली, "पवित्रा रिश्ता मालिकेतनंतर काय पो छे सिनेमा येणार होता. सुशांतला काय पो छे सिनेमा मिळाला होता. मला कास्टिंग दिग्दर्शकाचा फोन आला. ते म्हणाले की तुम्ही पण तुमचे फोटो पाठवा. चित्रपटात सुशांतच्या बहिणीची भूमिका गुजराती होती. त्यामुळे ते म्हणाले की फोटोबरोबर तुझं गुजरातीमध्ये ऑडिशनही पाठव".
"मी गुजरातीत बोलून ऑडिशन पाठवलं. त्यांना ते आवडलंदेखील...ते म्हणाले होते की जवळपास तुझं झालं आहे. मी २-३ महिने वाट पाहिली. काही दिवसांनी मला त्या कास्टिंग दिग्दर्शकाचा फोन आला आणि ते म्हणाले की तुझं नाही झालं. कारण, त्यांना एक गोरी मुलगी हवी होती. माझं असं झालं की ओके. हा स्ट्रगल, हे रिजेक्शन....कुठल्या कारणामुळे रिजेक्शन मिळतंय हे तुम्ही आवर्जुन लक्षात ठेवलं पाहिजे", असंही तिने सांगितलं.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाई गं या सिनेमातून प्रार्थना प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. माझी तुझी रेशीमगाठ ही प्रार्थनाची मालिकाही प्रचंड गाजली.