मित्रांच्या रियुनियनमध्ये जमणार ठसकेबाज लावणीचा माहोल; 'चिकी चिकी बुबूम बुम' मधील नवं गाणं प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 17:58 IST2025-02-21T17:56:33+5:302025-02-21T17:58:46+5:30
सध्या मराठी मनोरंजनविश्वात प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

मित्रांच्या रियुनियनमध्ये जमणार ठसकेबाज लावणीचा माहोल; 'चिकी चिकी बुबूम बुम' मधील नवं गाणं प्रदर्शित
Chiki Chiki Booboom Boom New Song: सध्या मराठी मनोरंजनविश्वात प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बुम' (Chiki Chiki Booboom Boom) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. येत्या २८ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठीतील सिनेसृष्टीतील बऱ्याच लोकप्रिय कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट. अशातच या चित्रपटातील नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
नुकतीच सोशल मीडियावर या गाण्याची झलक शेअर करण्यात आली आहे. "रंगली रात्र, माहोल जमला भारी..., फक्कड लावणी घेऊन ती आलीये आणि म्हणतीये 'कारभारी'..." असं कॅप्शन देत सोशल मीडियावर अकाउंटवर या गाण्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला रोहन रोहन यांचं संगीत तर गायिका कविता राम यांनी या लावणीला आवाज दिला आहे. हे गाणं प्रेक्षकांसाठी एक अनोखी म्युझिकल ट्रिट ठरलं आहे. सध्या या गाण्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस पाडण्यात येत आहे.
नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या 'चिकी चिकी बुबूम बुम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बूम' या चित्रपटात मराठी कलाकारांची तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे हे कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचे चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे. धमाल मस्तीचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांसाठी एक वेगळीच ट्रीट असणार आहे.