का होतेय प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केलेल्या राज ठाकरेंच्या स्टाईलमधील फोटोची चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 05:41 PM2019-08-24T17:41:01+5:302019-08-24T17:43:51+5:30
राज ठाकरेंच्या स्टाईलमधील प्रसाद ओकचा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केला असून या फोटोसोबत त्याने एक खास कमेंट देखील लिहिली आहे.
आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहाण्यासाठी सध्या सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात. आपल्या खाजगी आयुष्यातील, आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे, व्हेकेशनचे फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अभिनेता प्रसाद ओक देखील देखील सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असल्याचे आपल्याला दिसून येते. पण प्रसादने शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण या फोटोत त्याची वेशभुषा तंतोतंत एका राजकीय व्यक्तीप्रमाणे आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहाण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी गुरूवारी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली. तिथे तब्बल नऊ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. लोकसभा निवडणूकीच्यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात केलेल्या प्रचारामुळेच सुडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. या सगळ्याची चर्चा सुरू असताना प्रसाद ओकने याच चर्चेशी संबंधीत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
राज ठाकरेंच्या स्टाईलमधील प्रसाद ओकचा फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केला असून या फोटोसोबत त्याने एक खास कमेंट देखील लिहिली आहे. त्याने या फोटोसोबत लिहिले आहे की, थिंकिंग अबाऊट इडियट्स (Thinking About EDitos). त्यावेळी त्याने इडियटच्या स्पेलिंगमध्ये आय न वापरता ई वापरला असल्याने त्याला काहीतरी सुचित करायचे आहे हे आपल्या लक्षात येत आहे.
प्रसादच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून प्रसादने हा फोटो पोस्ट करून ईडीकडून राज ठाकरेंच्या झालेल्या चौकशीबद्दल टोमणा मारला आहे म्हटले जात आहे. त्याच्या या पोस्टला सामान्य लोकांनीच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील लाईक केले आहे. त्याच्या या पोस्टवर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी लाईक केले असून अनेकांनी त्यावर कमेंट देखील केली आहे. वा वा.. अतिशय मार्मिक असे प्राजक्ता माळीने प्रसादच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे.