शेवटी घरची पोळी भाजीच बेश्ट...! 'त्याचा' फोटो शेअर करत प्रशांत दामले यांचं घरी राहण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 19:54 IST2021-04-25T19:50:42+5:302021-04-25T19:54:53+5:30
प्रशांत दामले यांची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होतेय; जाणून घ्या काय आहे खास

शेवटी घरची पोळी भाजीच बेश्ट...! 'त्याचा' फोटो शेअर करत प्रशांत दामले यांचं घरी राहण्याचं आवाहन
कोरोनामुळे बाहेरची स्थिती भीषण झालीये़ सध्या प्रत्येकजण कोरोना नावाच्या अदृश्य व्हायरशी लढतोय. कुणी घरात तर कुणी कोरोना योद्धा, अत्यावश्यक सेवेचा दूत बनून मैदानात. या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमी. मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी यानिमित्ताने कुटुंबाला जपणा-या गृहिणींचे आणि जीव धोक्यात घालून काम करणा-या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येकाचे आभार मानले आहेत. शिवाय सर्वांना घरी राहण्याचे आवाहनही केले आहे.
प्रशांत दामले यांची आभार व्यक्त करणारी ही फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. (Prashant Damle facebook post)
‘कधी कधी ठीक आहे पण शेवटी घरची पोळी भाजीच बेश्ट... वर्षानुवर्षे अतिशय प्रेमाने, निगुतीने संपूर्ण घराला सशक्त ठेवणा-या सुगरणींना खूप धन्यवाद आणि अत्यावश्यक सेवेतील जीवावर उदार होऊन काम करणा-या सर्वांनाच मनापासून सलाम. आपण घरातच थांबण हीच त्यांना मदत आहे नाही का?’, असे प्रशांत दामले यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
या पोस्टसोबत त्यांनी फूड डिलिव्हरी करणा-या एका डिलिव्हरी बॉयचे फोटोही शेअर केले आहेत. यात पार्सल घेऊन निघालेला एक डिलिव्हरी बॉय घरचा डबा खाताना दिसतोय. कदाचित त्यानेही घरची पोळी भाजीच बेश्ट असा संदेश यातून दिला आहे.
सध्या प्रशांत दामले यांच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट करताना दिसत आहेत. अगदी खरं बोललात सर, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स त्यांच्या पोस्टवर पाहायला मिळताहेत.