एकेकाळी फक्त ८५० रुपयांत घर चालवायच्या प्रशांत दामलेंच्या पत्नी, अभिनेत्याने सांगितला 'तो' कठीण काळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 05:28 PM2023-12-02T17:28:53+5:302023-12-02T17:29:18+5:30
Prashant Damle : प्रशांत दामले गेल्या ४० वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या नावावर लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद देखील झाली. त्यांना या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
मराठी रंगभूमी जगलेले नट म्हणजे प्रशांत दामले (Prashant Damle). प्रशांत दामलेंनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. ते अभिनेते उत्तम गायक तर आहेतच यासोबतच उत्तम निर्मातेही आहेत. नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरसोबत त्यांच्या खडतर प्रवासाबद्दलही सांगितले.
प्रशांत दामले गेल्या ४० वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या नावावर लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद देखील झाली. त्यांना या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. याबद्दल त्यांनी नुकतेच सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या कार्यक्रमात सांगितले. त्या कठीण काळाबद्दल त्यांनी सांगितले की, २७ डिसेंबर १९८५ मध्ये माझे लग्न झाले, १९८६ मध्ये मी माझे पहिले नाटक ब्रह्मचारी केले. एकतर माझी पत्नी गौरीचा माझ्यावर असलेला विश्वास खूप महत्त्वाचा आहे. १९८७ साली मला पहिली मुलगी झाली आणि १९९२ ला दुसरी मुलगी झाली.
फक्त नाटकावर लक्ष केंद्रित केलं
ते पुढे म्हणाले की, मला आठवते आहे की, साधारणपणे गौरी ८५० रुपयांत घर चालवायची आणि कुठेही काही कमी नसायचे, तक्रार नसायची. मला पहिली नाइट २५ रुपये मिळाली होती, त्यानंतर ७५ रुपये झाली. विश्वास आणि व्यवस्थापन यामुळेच हे सगळे शक्य झाले. १९९२ ला जेव्हा गेला माधव कुणीकडे या नाटकाला पहिला हाऊसफूलचा बोर्ड लागला तेव्हा मी गौरीशी बोललो की आता बेस्टमध्ये आपली जागा फार काळ अडवून ठेवण्यात काही अर्थ नाही. माझ्याजागी तिथे दुसऱ्या कोणाला तरी नोकरी लागू शकते, आता या नाटकावर आपण पुढे जाऊ शकतो, तेव्हा तिनेही मला पाठिंबा दिला. त्यानंतर मी नोकरी सोडून फक्त नाटकावर लक्ष केंद्रित केलं.
माझ्या पत्नीने तिचे आयुष्य ॲडजस्ट केले
त्यावेळी मी फक्त नाटकात काम करत होतो. अभिनय करत होतो, मात्र घर सांभाळणे हे खूप कठीण काम आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत घरातील स्त्री असंख्य काम करत असते. वेळेचं नियोजन ही स्त्रियांकडे उपजत असते. त्यात जर डोंबिवली ते मुंबई प्रवास करत नोकरी करणारी स्त्री असेल तर मला तिचे पायच धरावेसे वाटतात. इतकी वर्ष माझ्या शेड्यूलप्रमाणे माझ्या पत्नीने तिचे आयुष्य ॲडजस्ट केले. तिने कोणत्याही समस्या माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत, असे प्रशांत दामलेंनी या मुलाखतीत सांगितले.