प्रथमेश परब झळकणार 'डार्लिंग'मध्ये, पुन्हा एकदा दिसणार रितीका श्रोत्रीसोबत
By तेजल गावडे | Updated: November 6, 2020 17:36 IST2020-11-06T17:35:36+5:302020-11-06T17:36:11+5:30
प्रथमेश परबचा 'डार्लिंग' चित्रपटातील लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

प्रथमेश परब झळकणार 'डार्लिंग'मध्ये, पुन्हा एकदा दिसणार रितीका श्रोत्रीसोबत
‘टाईमपास’फेम ‘टकाटक’ प्रथमेश परब आपल्या चाहत्यांना आश्वर्याचा धक्का देण्यासाठी सज्ज झाला असून त्याचा ‘डार्लिंग’ लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘डार्लिंग’मधून प्रथमेश परब एका नव्या रूपात आणि एका नव्या ढंगात सिनेरसिकांना भेटणार आहे. प्रथमेशच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असून ‘टाईमपास’मध्ये दगडू बनून तर ‘टकाटक’मध्ये ठोक्याच्या रूपात धमाल करणारा त्यांचा लाडका अभिनेता आता कोणते रंग उधळणार याबाबतची उत्सुकता संपूर्ण सिनेसृष्टीला लागली आहे.
निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांच्या ७ हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार केलेल्या ‘डार्लिंग’ या आगामी सिनेमात प्रथमेश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं असून, पुन्हा एकदा प्रथमेशच्या जोडीला अभिनेत्री रितीका श्रोत्री दिसणार आहे.
‘डार्लिंग’चं मोशन पोस्टर आणि रितीकाचा फर्स्ट लुकही रिलीज करण्यात आला, त्यामुळे या सिनेमात रितीकाचा नायक कोण बनला असल्याबाबत सिनेसृष्टीपासून सिनेरसिकांपर्यंत सर्वांमध्येच चर्चा सुरू होती, पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
‘डार्लिंग’ सिनेमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यांची आवडती ‘टकाटक’ जोडी दिसणार आहे. ‘डार्लिंग’ या सिनेमात दोघे कोणत्या प्रकारच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत त्याबाबत अद्याप गुपित राखण्यात आलं असलं तरी प्रथमेश-रितीकाची जोडी ‘डार्लिंग’मध्ये दुसऱ्यांदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाल्याचे म्हणायला हरकत नाही.
समीर आशा पाटील या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट ७ जानेवारी २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.