दगडू दादूसची सासरवाडी पाहिलीत का? प्रथमेश परबनं शेअर केली खास झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 03:16 PM2024-02-18T15:16:45+5:302024-02-18T15:19:31+5:30
प्रथमेश नुकताच आपल्या सासरी पोहचला आहे.
'टाइमपास' फेम अभिनेता प्रथमेश परब त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. प्रथमेशची सध्या लगीनघाई सुरू आहे. प्रथमेशने नुकताच ने व्हॅलेंटाइन डेचा मुहुर्त साधत गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरबरोबर साखरपुडा केला आहे. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच प्रथमेश नुकताच आपल्या सासरी पोहचला आहे. लाडक्या जावायचं सासुरवाडीत जोरदार स्वागतं करण्यात आलं आहे. याचे फोटो प्रथमेशने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रथमेश नुकताच क्षितिजाच्या घरी श्रीवर्धन येथे गेला आहे. सासरवाडीत गोड कौतुक पाहून प्रथमेशही भारावून गेल्याचं दिसून आलं. प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या स्वागतासाठी सुंदर अशी रांगोळी काढल्याचं पाहायला मिळालं. त्या रांगोळीवर 'सासुरवाडीत स्वागत आहे' असं लिहिलं आहे. यासोबत क्षितिजा आणि प्रथमेश या दोघांनी समुद्रकिनारी खास वेळ घालवल्याचंही फोटोमधून दिसून आलं.
प्रथमेशसोबतच क्षितिजानेही काही खास फोटो शेअर केले आहेत. यात दोघेही घरच्या अंगणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. फोटोला 'जावई अॅट सासुरवाडी', असं कॅप्शन क्षितिजानं दिलं आहे. त्यांनी शेअर केलेले हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहेत.
प्रथमेश आणि क्षितीजा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनतर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितीजा विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी चाहतेही उत्सुक आहेत.