पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; म्हणाले, "आतंकवादी आज घरात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:35 IST2025-04-23T12:34:23+5:302025-04-23T12:35:42+5:30
मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक - अभिनेते प्रवीण तरडे यांच्या मित्राचा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; म्हणाले, "आतंकवादी आज घरात..."
काल संपूर्ण देशाला सुन्न करणारी घटना घडली. मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (pahalgam attack) येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये २० हून जास्त पर्यटकांचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील सहा व्यक्तींचा समावेश होता. यात पुण्यातील संतोष जगदाळे (santosh jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष जगदाळे हे मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (pravin tarde) यांचे खास मित्र होते. संतोष यांच्या निधनामुळे प्रवीण तरडेंना धक्का बसला आहे.
प्रवीण तरडेची मित्रासाठी भावुक पोस्ट
प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लिहिलंय की, "आतंकवाद आज घरात आला.. माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला..मित्रा संतोष माफ कर आम्हाला आम्ही काही करू शकत नाही..". प्रवीण तरडेंच्या ही पोस्ट वाचून अनेकांना धक्का बसला. संतोष जगदाळे यांचं दहशतवादी हल्ल्यात निधन झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली.
महाराष्ट्रातील या सहा जणांचा मृत्यू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, तर रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे. पहलगाममधील बैसरन घाटी येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी नाव विचारून आणि धार्मिक ओळख परेड करून फक्त पुरूष पर्यटकांवरच गोळ्या झाडल्या. यात २६ जणांचा मृत्यू झाला. जगभरातील तमाम नागरीक या भ्याड हल्ल्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.