प्रवीण तरडे साऊथच्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाला मानतात गुरु, ऑफिसमध्ये लावलाय त्यांचा भला मोठा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 06:00 AM2023-02-05T06:00:00+5:302023-02-05T06:00:00+5:30
Pravin Tarde : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रयोगशील दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता म्हणजे प्रवीण तरडे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रयोगशील दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता म्हणजे प्रवीण तरडे (Pravin Tarde). देऊळ बंद, सरसेनापती हंबीरराव, मुळशी पॅटर्न अशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करून प्रवीण तरडे यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. प्रवीण तरडे साऊथच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला आपले गुरु मानतात.
एक उत्कृष्ट लेखक, अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे प्रसिद्ध असले तरी दाक्षिणात्य दिग्दर्शक राजा मौली यांचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. प्रवीण तरडे हे फक्त फॅन्स नाही तर ते राजा मौली यांच्यासाठी मी ‘एकलव्य’ आहे असे सांगून स्वतःला त्यांचे शिष्य मानतात. इतकेच नाही प्रवीण तरडे यांनी आपल्या ऑफिसमध्ये चक्क राजा मौली यांचा भलामोठा फोटो फ्रेम करून लावला आहे.
याबद्दल प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘मी त्यांचा एकलव्य आहे’ असे म्हणत प्रवीण तरडे राजा मौली यांना गुरू मानतात. ‘ माझ्या ऑफिसमध्ये जर तुम्ही एन्ट्री केली तर समोर भिंतीवर तुम्हाला राजा मौली यांचा भलामोठा फोटो तुम्हाला दिसेल. गेल्या सात वर्षांपासून तो फोटो तिथे आहे.
ते पुढे म्हणाले की, मी ऑफिसवर गेल्यावर पहिल्यांदा त्यांच्या फोटोकडे पाहतो का तर या माणसाने जसे त्याचे स्थानिक चित्रपट जगभर पोहोचवले त्यांच्या चित्रपटांची जगाने दखल घेतली त्याचा प्रभाव माझ्यावर पडला आहे. त्यामुळे माझ्या चित्रपटांची दखल जगाने घ्यावी असे चित्रपट मी बनवावे असे मला वाटते. मी त्यांना भेटलो तेव्हा मी खूप भावुक झालो. त्यावेळी ते त्यांच्या भाषेत बोलत होते मी सुद्धा माझ्या भाषेत बोलत होतो. ते त्यांची भाषा सोडून बोलत नाहीत म्हणून मी पण मुद्दामहून मराठी भाषेतूनच बोललो.
प्रभासने सुद्धा माझ्या चित्रपटाचा टिझर शेअर केला होता. मुळशी पॅटर्न चित्रपटामुळे मला बॉलिवूड, टॉलिवूड क्षेत्रात ओळख मिळाली. त्यामुळे मी मुळशी पॅटर्न चित्रपट बनवला होता हे त्याला माहित होते पण माझ्या चित्रपटाचा टीझर त्याला आवडला म्हणून त्याने तो शेअर करताना माझं कौतुक केले होते, असे त्यांनी सांगितले.