Sarsenapati Hambirrao : कोणताही चित्रपट २ ते ३ दिवसांपेक्षा अधिक..., ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 11:29 AM2022-08-14T11:29:06+5:302022-08-14T11:30:35+5:30
Sarsenapati Hambirrao Marathi Movie : ‘सरसेनापती हंबीरराव’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेज प्रॉडक्शन टीमने पोस्ट शेअर केली आहे...
मराठी ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो. पावनखिंड, फत्तेशिकस्त हे ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. याच शृंखलेतील ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने सुद्धा गर्दी खेचली. सध्याच्या काळात कोणताही सिनेमा सुपरहिट होण्याचं प्रमाण दुर्मिळ होत आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ याला अपवाद ठरला. बॉक्स ऑफिसवर ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) सुपरहिट ठरला. याबद्दल ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत.
‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात प्रविण तरडे (Pravin Tarde ) यांनी सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका साकारली आहे. त्यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांमध्ये ८ कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.
प्रॉडक्शन टीमची पोस्ट...
‘सरसेनापती हंबीरराव’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेज प्रॉडक्शन टीमने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘मित्रांनो, २७ मे रोजी आपला सरसेनापती हंबीरराव प्रदर्शित झाला. २७ मे नंतर आजपर्यंत जवळपास ३० पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. पण यातील कोणताही चित्रपट २ ते ३ दिवसांपेक्षा अधिक काळ चालला नाही. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरणारा गेल्या अडीच तीन महिन्यातील आपला सरसेनापती हंबीरराव हा शेवटचाच चित्रपट आहे. सध्याच्या काळात कोणताही चित्रपट हा चित्रपटगृहात सुपरहिट होण्याचं प्रमाण अतिशय दुर्मिळ होत आहे. अशा काळात आपण मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांनी आमच्या सारख्या चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या उर्विता प्रॉडक्शनच्या पहिल्या वहिल्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाला ज्या पद्धतीने उचलून धरलं त्याबद्दल आपले आभार मानायला आज अक्षरश: शब्द अपुरे आहेत.
आपण सरसेनापती हंबीरराव हा आपल्या घरचा चित्रपट समजून जे प्रेम दिलंत आणि ज्या पद्धतीने चित्रपटगृहात हा चित्रपट चालवलात नव्हे मी तर म्हणेन अक्षरश: वाजवलात त्याचं सर्व श्रेय हे सर्वस्वी फक्त आणि फक्त तुमचंच आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे टीम सरसेनापती हंबीरराव आणि उर्विता प्रॉडक्शनतर्फे मी जाहीर आभार व्यक्त करतो... आपले प्रेम असेच निरंतर राहो... येत्या काळात आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमरूपी ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नरत राहू...’